हरवलेले सोन्याचे शहर असण्याची चर्चा
अमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात घनदाट जंगलांपैकी एक आहे. या जंगलात अनेक रहस्ये सामावलेली आहेत. येथे सोन्याचे शहर असल्याचे बोलले जाते, ज्याचा शोध घेण्यासाठी गेलेले अनेक लोक कधीच परतले नाहीत. सोन्याचे शहर मिळाले नसले तरीही वैज्ञानिकांनी संशोधनादरम्यान तेथे पिरॅमिड आणि मध्य युगाच्या काळातील विशाल वसाहती शोधून काढल्या आहेत. येथील पिरॅमिडांची उंची सुमारे 8 मजल्यांइतकी आहे. नेचर जर्नलमध्ये यासंबंधीचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. घनदाट जंगलांमध्ये अशाप्रकारचा शोध घेणे अत्यंत अवघड असल्याने नव्या तंत्रज्ञानाद्वारे याविषयी थांगपत्ता लावण्यात आला आहे.
लेझर मॅपिंग तंत्रज्ञानाद्वारे हे थक्क करणारे निष्कर्ष मिळाले आहेत. हेलिकॉप्टरवर लेझर मॅपिंग उपकरण बसवून त्याला जंगलाच्या अनेक हिस्स्यांवर नेण्यात आले. या उपकरणाद्वारे एक थ्री-डी इमेज मिळाली आहे.
पिरॅमिडचा शोध
सुमारे 1500 वर्षांपूर्वी प्राचीन अमेझॉनियन लोकांनी या पिरॅमिडांची निर्मिती केली आणि ते दाट लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये राहत होते असे संशोधकांनी म्हटले आहे. येथील मातीद्वारे तयार करण्यात आलेल्या पिरॅमिडची उंची 22 मीटर इतकी आहे.तसेच लोकवस्ती राहिलेला भाग अनेक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी जोडला गेलेला होता. आतापर्यंत आम्ही अमेझॉनमध्ये वसलेल्या संस्कृतीला ज्या दृष्टीकोनातून पाहायचो, त्यापेक्षा हा शोध खूपच वेगळा असल्याचे उद्गार या संशोधनात सामील कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे पुरातत्व तज्ञ क्रिस फिशर यांनी काढले आहेत.
प्राचीन शहरांचे अस्तित्व
येथे राहणारे लोक छोटय़ा समुहांमध्ये मर्यादित सामाजिक विकास आणि शेतीच्या मदतीने राहत होते असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु या ठिकाणी झालेल्या शोधामुळे ही धारणा बदलली आहे. या छोटय़ा वस्ती नव्हे तर शहर होते असे आम्हाला आढळून आले आहे. 2019 मध्ये जर्मनी आणि ब्रिटनच्या संशोधकांनी हेलिकॉप्टरद्वारे 77 चौरस मैल क्षेत्राला स्कॅन केले होते. बोलिवियामध्ये 26 वसाहती आढळून आल्या होत्या असे फिशर यांनी सांगितले आहे.