पीसी विंगसाठी इमारतीचे होणार बांधकाम : दुर्गामाता मंदिर स्थलांतर करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
अरगन तलाव जवळील आरए लाईन म्हणून ओळख असलेल्या स्वच्छता कामगारांचे क्वॉर्टर्स भुईसपाट केले आहेत. या ठिकाणी संरक्षण खात्याचे पीसी विंगचे कार्यालय व प्रशिक्षण केंद्र बनविण्यात येणार आहे. याकरिता हे काम युद्धपातळीवर सुरू असून, येथील दुर्गामाता मंदिर स्थलांतरची सूचना करण्यात आली आहे.
संरक्षण खात्याने डेअरी फार्मची जागा ताब्यात घेऊन येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच इमारतीच्या बांधकामास देखील प्रारंभ केला आहे. नानावाडीजवळ मिलिटरीच्या पीसी विंग विभागासाठी जागा अपुरी पडू लागल्याने स्थलांतराचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. प्रशिक्षण केंद्राबरोबर विविध उपक्रम राबविण्यासाठी नानावाडीतील जागा कमी पडत आहे. त्यामुळे अरगन तलाव परिसरात असलेल्या जागेत कोटय़वधी निधी खर्च करून पीसी विंगचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
ब्रिटिश काळातील आरए लाईन
बेळगाव वेंगुर्ला रस्त्याशेजारी एका बाजूला अरगन तलाव आहे. तर दुसऱया बाजूला आरए लाईन वसाहत होती. आरए लाईनमध्ये संरक्षण खात्यामध्ये काम करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे क्वॉर्टर्स खराब झाल्याने या ठिकाणी कोणीच राहात नाही. ब्रिटिश काळात आरए लाईन स्थापन करण्यात आली होती. वास्तविक पाहता ब्रिटिश काळात रॉयल आर्टलरी लाईन्स म्हणून नाव ठेवले होते. ब्रिटिश काळात स्वच्छता व विविध कामे करणाऱया कर्मचाऱयांना राहण्यासाठी हे क्वॉर्टर्स निर्माण केले होते. त्यामुळे या वसाहतीला आरए लाईन नाव पडले होते. या वसाहतीजवळच दुर्गामाता मंदिर असून, दरवषी दसरोत्सवात देवीची मिरवणूक काढली जाते. मोठय़ा उत्साहाने या ठिकाणी दसरा साजरा करून महाप्रसाद होतो.
मंदिर स्थलांतर जागा द्या
मात्र पीसी विंगसाठी या परिसरात इमारतींचे बांधकाम सुरू केले आहे. कर्मचाऱयांसाठी क्वॉर्टर्स तसेच कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याकरिता येथील पूर्ण झाडे हटविली आहेत. तसेच आरए लाईनचे क्वॉर्टर्स भूसपाट केले असून, दुर्गामाता मंदिर स्थलांतर करण्यासाठी मंदिराचे पुजारी व समाजाच्या पदाधिकाऱयांना सूचना केली आहे. पण हे मंदिर कुठे स्थलांतर करायचे असा मुद्दा उपस्थित झाला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे मंदिर असून, या ठिकाणी भक्तिभावे पूजा केली जाते. मंदिर स्थलांतर करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मिलिटरी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
कार्यालय-क्वॉर्टर्स उभारणीसाठी तरतूद
पीसी विंगचे कार्यालय व क्वॉर्टर्स उभारणीसाठी संरक्षण खात्याने कोटय़वधीची तरतूद केली असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामासाठी विशेष कामगार आणण्यात आले असून, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अरगन तलावच्या निसर्गरम्य परिसरात लवकरच काँक्रिटच्या इमारती उभारल्या जाणार आहेत.