मसूर फाटय़ावरील निकृष्ट कामाचा फटका; शिवडे ते उंब्रज दरम्यान वाहतूक कोंडी
प्रतिनिधी/ उंब्रज
शनिवारी उंब्रजने कधी नव्हे ती प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवली. कोंडीमुळे महामार्गावरील वाहने सेवारस्त्यावर आल्याने ऐन दिवाळीत रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना नुकसानीचा सामना करावा लागला. मसूर फाटय़ावरील निकृष्ट कामाचा फटका शनिवारी मुंबई-पुण्यावरून आलेल्या चाकरमान्यांसह स्थानिकांना बसला. रस्त्यासाठी हजारो रुपयांचा टोल भरूनही वाहनधारकांना शिवडे ते उंब्रज दरम्यान सकाळपासून तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने वाहनधारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उंब्रज येथे दुपारी तीननंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सेवारस्त्यांवरही वाहतूक कोंडी निर्माण झाली.
दिवाळीच्या सुट्टय़ा लागल्याने मुंबई-पुण्यातील चाकरमानी मोठय़ा संख्येने गावाकडे परतू लागला आहे. परिणामी महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र सर्व ठिकाणी पहायला मिळत होते. शिवडे ते उंब्रज दरम्यानच्या प्रवासात वाहनधारक वैतागून गेले. तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहनधारकांना तासन्तास रांगेत अडकून पडावे लागले. शनिवारी सकाळपासून उंब्रज ते शिवडे दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. उंब्रजमध्ये रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होती. त्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागला.
आशियाई महामार्गावर मसूर फाटा येथे अंडरपास पुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे. परंतु सेवारस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले.
शिवडे गावच्या हद्दीतील मसूर फाटा येथे सेवारस्त्यावर खड्डे पडल्याने अवजड व सर्व चारचाकी, दुचाकी वाहनांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून महामार्गावर शिवडे येथून उंब्रजपर्यंत दररोज वाहनांची रांग लागते. या वाहतूक कोंडीने वाहनधारक व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे महामार्गावरील वाहतुकीला पर्यायी रस्ता म्हणून सेवारस्त्याचे रुंदीकरण करून नवीन रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. मात्र पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वाहनधारकांची तारेवरची कसरत सुरू असून अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे.
महामार्गावर चोवीस तास मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. वाहनाला वाहन खेटून प्रवास सुरू असतो. मात्र याचे भान न ठेवता कराड तालुक्यातील शिवडे व इंदोली येथे ठेकेदाराने अंडरपास पुलाचे काम सुरू ठेवले आहे. मनमानी पद्धतीने सेवारस्त्यांची बांधणी करून तेथून वाहतूक सुरू केल्याने मसूर फाटा येथे गेल्या तीन महिन्यांत चार जणांचे अपघातात बळी गेले आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार व प्राधिकरण विभागाचे अधिकारी चकार शब्द काढायला तयार नसल्याने वाहनधारकांना हकनाक जीवास मुकावे लागत आहे. सद्यस्थितीत येथे वारंवार अपघात व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही रस्त्यांची पूर्णपणे दुरुस्ती न करता निव्वळ वरवरची मलमपट्टी केली जाते. त्यामुळे ऐन दिवाळीत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
ठेकेदाराला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त
इंदोली फाटा येथे निकृष्ट कामाने अंडरपास पुलाचे काम होईपर्यंत वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शिवडे येथील मसूर फाटय़ावरही तीच परिस्थिती आहे. निकृष्ट सेवारस्त्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, वाहनांचे नुकसान सुरू आहे. तसेच अनियोजित कामामुळे अपघात होऊन काहींचे बळी गेले आहेत. मात्र संबंधित ठेकेदारास जिह्यातील लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याने मनमानी कारभार सुरू असून वाहनधारक व सर्वसामान्यांना त्रास सुरू आहे.
-हेमंतराव जाधव, तालुकाध्यक्ष,
कराड उत्तर काँग्रेस