राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष : सचिन पायलट यांनी सोनिया गांधींना सुनावले : अन्यथा पंजाबसारखी स्थिती होणार
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. राजस्थानात लवकर मुख्यमंत्री बदलण्यात यावा, अन्यथा पंजाबसारखी स्थिती पक्षावर ओढवणार असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे.
सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा यांची भेट घेत राजस्थानात सत्ता राखायची असल्यास मुख्यमंत्री बदलावा लागणार असल्याचे सुनावले आहे. मुख्यमंत्री त्वरित बदलण्यात यावा, अन्यथा पंजाबसारखे अपयश पदरी पडणार असल्याची भूमिका पायलट यांनी मांडली आहे.
एप्रिल महिन्यात सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांची तीनवेळा भेट घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय काँग्रेस समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या सूचनांनुसार काम करावे लागणार आहे. राज्यात 2023 मध्ये होणाऱया निवडणुकीत काँग्रेस सरकार सत्तेवर आणणे लक्ष्य आहे. माझ्या भूमिकेवर पक्षशेष्ठींना निर्णय घ्यायचा असल्याचे पायलट यांनी 21 एप्रिल रोजी सोनिया गांधींची भेट घेतल्यावर बोलताना म्हटले होते.
गेहलोतही सक्रीय
सोनिया गांधी यांना सचिन पायलट भेटल्यावर अशोक गेहलोत यांनी महत्त्वाचे विधान केले होते. मुख्यमंत्री झाल्यापसून माझा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे देऊन ठेवला आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल, तेव्हा कुणालाच याचा सुगावा लागणार नसल्याचे गेहलोत यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.
गेहलोत-पायलट संघर्ष
2020 मध्ये सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडून 18 आमदारांसह गुरुग्राम येथील एका रिसॉर्टमध्ये ठाण मांडले होते. परंतु पक्षशेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शांत झाले होते. काँग्रेसने वाद सोडविण्यासाठी अजय माकन, प्रियांका वड्रा आणि के.सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली होती.
पंजाबमध्ये मोठा पराभव
पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या 4 महिन्यांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवत चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले होते. काँग्रेसच हा प्रयोग निवडणुकीत अयशस्वी ठरला होता. चरणजीत सिंह चन्नी हेच पराभूत झाले होते.