प्रतिनिधी /बेळगाव
राज्य मानव हक्क आयोगाचे को-चेअरमन आर. के. दत्ता यांनी नुकतीच हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी त्यांना माहिती दिली.
आर. के. दत्ता हे निवृत्त राज्य पोलीस महासंचालक आहेत. सेवानिवृत्तीनंतर राज्य मानव हक्काचे को-चेअरमन म्हणून त्यांची सेवा सुरू आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी कारागृहाला भेट देऊन संपूर्ण कारागृहाची पाहणी केली. कैद्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत त्यांनी कारागृहाची पाहणी केली. कारागृह विभागाने सुरुवातीला त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर कारागृहाच्या प्रत्येक विभागाला भेटी देऊन तेथे चालणाऱया कामकाजाची त्यांनी माहिती करून घेतली. खास करून कैद्यांना कशा पद्धतीचे जेवण मिळते याची त्यांनी पाहणी केली.
कारागृहातील प्रत्येक विभागाला भेट देऊन नंतर अंधेरी विभागातही त्यांनी पाहणी केली. उमेश रेड्डी आदींसह वेगवेगळय़ा कैद्यांशी चर्चा करून कारागृहातील व्यवस्थेविषयी त्यांनी माहिती करून घेतली. जेवण उत्तम आहे. येथील इमारती जुन्या झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱयांनी त्यांना सांगितले.