वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनचे आव्हान संपुष्टात, लिरेनविरुद्ध फायनल रंगणार
चेन्नई / वृत्तसंस्था
युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद मेल्टवेयर चॅम्पियन्स चेस टूर चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने डच ग्रँडमास्टर अनिश गिरीला धक्कादायकरित्या पराभूत केले. प्रज्ञानंदने बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत अनिश गिरीला 3.5-2.5 अशा फरकाने मात दिली. आता जेतेपदासाठी प्रज्ञानंदची लढत चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध होईल. या स्पर्धेतील आणखी एका उपांत्य लढतीत लिरेनने जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित मॅग्नस कार्लसनला 2.5-1.5 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला.
भारतीय स्टार ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला त्याच्यापेक्षा सरस मानांकित गिरीला नमवण्यासाठी टायब्रेकपर्यंत लढावे लागले. प्रारंभी उभयतातील 4 गेम्सची लढत 2-2 अशा बरोबरीत राहिली होती. त्यानंतर टायब्रेकमध्ये प्रज्ञानंदने बाजी मारली.
सेमीफायनलमधील ओपनिंग गेम बरोबरीत राहिल्यानंतर 16 वर्षीय प्रज्ञानंदने दुसरा गेम जिंकला. अनिश गिरीसाठी हा या स्पर्धेतील केवळ पहिला पराभव होता. त्यानंतर तिसऱया गेममध्ये अनुभवी गिरीने वर्चस्व गाजवण्याच्या दिशेने आगेकूच केली. पण, चेस सर्कल्ससाठी ओळखल्या जाणाऱया प्रज्ञानंदने जोरदार लढत देत बरोबरी प्राप्त केली व 2-1 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर चौथा गेम बरोबरीत रोखला तरी पुरेसे ठरणार असले तरी प्रज्ञानंदचे मनसुबे गिरीने धुळीस मिळवत विजय मिळवला आणि ही लढत 2-2 अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर टायब्रेकचा अवलंब केला गेला.
टायब्रेकमध्ये पहिल्या ब्लित्झ गेममध्ये डचमन गिरीला 33 चालीत पराभव मान्य करावा लागला. दुसऱया टायब्रेक गेममध्ये गिरीने पुरेपूर प्रयत्न केले. पण, प्रज्ञानंदला बरोबरी मिळवत आगेकूच करण्यापासून तो रोखू शकला नाही.