दरवर्षी 1600 कोटींचे होतेय नुकसान
ऑस्ट्रेलियात संशांची संख्या सुमारे 20 कोटींच्या आसपास झाली आहे. ही संख्या देशासाठी आता एक नवी आपत्ती ठरली आहे. मूळात ससा हा ऑस्ट्रेलियातील स्थानिक प्राणी नाही. त्यांना तेथे इनव्हेसिव्ह स्पीशिज मानले जाते. हे ससे ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची कहाणी मोठी रंजक आहे.
25 डिसेंबर 1859 रोजी नाताळावेळी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न बंदरावर इंग्लंडमधून एक जहाज पोहोचले होते. यात थॉमस ऑस्टिन नावाच्या व्यक्तीने नाताळाची भेट म्हणून 24 ससे आणले होते. ऑस्टिन हे इंग्लंडचे रहिवासी होते आणि मेलबर्नमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना स्वतःच्या जमिनीत अनेक ससे पाळायचे होते. याचमुळे त्यांच्या भावाने इंग्लंडमधून युरोपीय ससे भेटवस्तू म्हणून पाठविले होते. यात जंगली आणि पाळीव दोन्ही प्रकारचे ससे सामील होते.
सिडनीमध्ये 1788 मध्ये 5 ससे पोहोचले, पुढील 70 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियात आणखी 90 ससे आणले गेले, परंतु वंशानुक्रमाच्या आधारावर बहुतांश सशांचा संबंध ऑस्टिन यांनी आणलेल्या सशांचीच आहे. या सशांची संख्या आता मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून पीक तसेच स्थानिक वृक्ष-रोपांचे नुकसान होत आहे. ऑस्ट्रेलियात बायोलॉजिकल इनव्हेजनचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या सशांमुळे दरवर्षी सुमारे 1600 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
ऑस्टिन यांना पाठविण्यात आलेले ससे मेलबर्नमध्ये पोहोचण्यास 80 दिवस लागले होते. यादरम्यान दोन्ही प्रकारच्या सशांमध्ये इंटरब्रीडिंग झाले, यामुळे 100 किलोमीटर प्रतिवर्ष या दराने हे ससे फैलावत गेले. 50 वर्षांमध्ये या सशांनी 13 पट अधिक मोठय़ा भूभागात शिरकाव केल्याचे संशोधनातून समोर आले आहे.