वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू रशेल हेन्स यांची मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी आयसीसीने निवड केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिन्ही प्रकारच्या मालिकेत बाबर आझमने फलंदाजीत शानदार प्रदर्शन केले. त्याने कसोटी मालिकेत 390 धावा जमविल्या. त्यातील दुसऱया कसोटीत त्याने 196 धावांची खेळी करीत संघाचा पराभव टाळून सामना अनिर्णीत राखला होता. त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेतही त्याने चमकदार फलंदाजी केली होती. आयसीसीच्या या बहुमानासाठी त्याच्यासह विंडीजचा क्रेग ब्रेथवेट, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांना नामांकन मिळाले होते. बाबरने दुसऱयांदा हा पुरस्कार मिळविला असून असा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्येही त्याला हा पुरस्कार मिळाला होता.
महिलांमध्ये हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाची सलामीवीर रशेल हेन्सला मिळाला. आयसीसी महिला विश्चचषक सातव्यांदा मिळवून देण्यात तिनेही मोलाची भूमिका बजावली. तिने आठ सामन्यांत 61.28 च्या सरासरीने 429 धावा फटकावल्या. तिच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत अपराजित राहता आले आणि अंतिम फेरीत इंग्लंडला हरवून जेतेपद पटकावता आले. या पुरस्कारासाठी इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन व दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलव्हार्ट यांनाही नामांकन मिळाले होते. ‘रशेलने ऑस्ट्रेलियासाठी आपल्या खेळात जबरदस्त सातत्य दाखविले. पहिल्याच सामन्यात तिने शतक नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदाचा पाया रचला होता. तिने पाया रचल्यानंतर इतरांना त्यावर डावाची बांधणी करणे सहज शक्य झाले. ती महिला क्रिकेटमधील एक दर्जेदार फलंदाज व उत्तम लीडर आहे,’ असे मत पाकची कर्णधार सना मिरने व्यक्त केले.