दोन बंदुका व आठ काडतुसे जप्त, राधानगरी वनविभागाची कारवाई
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात पिरळपैकी डुबलवाडी रस्त्यावर वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिकारीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरताना चौघांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडून दोन बंदुका आणि दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.त्यांच्यावर वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वन्यजीव विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना बळवंत महादेव चौगुले, संजय विठ्ठल सुतार, उत्तम भाऊ चव्हाण हे तिघे रा. पिरळ पैकी चौगलेवाडी हे शिकारीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असताना दिसून आले. वन्यजीव अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता डबल बॅरेल 12 बोर दोन बंदुका आढळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पिरळ पैकी डुबलवाडी येथील विजय आनंदा एकावडे यांनी डूबलवाडी येथील कांदरमळी या स्थानिक नावाने ओळखळ्या जाणाऱ्या शेतामध्ये शिकार करण्याच्या उद्देशाने गेलो असल्याचे कबूल केले. त्यानुसार सदर आरोपींना पुढील चौकशीसाठी वन्यजीव विभागाने ताब्यात घेतले. आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक भैरवनाथ यादव, एम. आर. वंजारे, ए, डी कुंभार, व्ही डी मस्के यांनी केली.