समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांचे आवाहन
राधानगरी/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे हरित क्रांतीचे प्रणेते, राधानगरी तालुक्याचे निर्माते, बहुजन उद्धारक, सामाजिक क्रांतीचे प्रवर्तक लोकराजा छ. शाहू महाराज यांच्या स्मृती जतन करण्यासाठी राधानगरी धरणाच्या पायथ्याशी उभारलेल्या स्मृती केंद्राचा उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळा रविवारी दि. १५ मे रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाहू प्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन छ. शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
या स्मृती केंद्राचे उद्घाटन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व विशेष उपस्थिती युवराज मालोजीराजे छत्रपती यांचेसह पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रवकर, खास, संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आम, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, फेजीवडे सरपंच फारूख नावळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मृती केंद्राचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या स्मृती केंद्राच्या उदघाटन प्रसंगी राधानगरी तालुक्यातून सुमारे १०० शाहू ज्योती कार्यक्रम स्थळी दाखल होणार आहेत. तसेच राधानगरी बस स्थानकापासून ते धरण स्थळापर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी राधानगरी ग्रा. प. व फेजीवडे ग्रा. प. च्या वतीने, रांगोळी, झेंडे, पताका, स्वागत कमान उभारण्यात येणार आहेत. छ. शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचे चित्ररथ व फेजीवडे ते धरणस्थळ येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या स्मृती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अभिजित तायशेटे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस फारूख नावळेकर, डॉ. व्ही. बी. सरावणे, दिपक शेट्टी, माजी सरपंच दादासो सांगावकर, बशीर राऊत, हसन राऊत, प्रकाश बालनकर इकबाल कलोट, प्रवीण पारकर, प्रा, चंद्रशेखर कांबळे, एम आर गुरव, तानाजी चौगुले आदी उपस्थित होते