तीन गुन्हे उघड, आणखी गुन्हे उघडकीस येण्याचा अंदाज
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी पोलिसांनी एका मोटारसायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. राधानगरी येथील स्वप्निल उर्फ सुहास नामदेव चव्हाण असे त्या आरोपीचे नाव आहे. आज त्याला राधानगरी न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून राधानगरी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केलं होते.राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील राधानगरी येथील आरोपी स्वप्निल उर्फ सुहास नामदेव चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने आपण मोटरसायकल चोरी असल्याचे कबूल करत गुन्ह्यातील चोरलेली मोटरसायकल वडिलांना दवाखान्यात दाखवण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगत लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यांच्याकडे आणि पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील चंद्रकांत मारुती शिंदे यांच्याकडे चोरीतील दोन मोटरसायकली गहाणवट ठेवल्याचे कबूल केले आहे. या आरोपीस ११ जून रोजी अटक करत १४ जून पर्यंत पोलीस कोठडीत रिमांड देऊन तपास केला.
आज राधानगरी न्यायालयात हजर केलं असता आणखीन दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. एस. कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. डी. पाटील, के. डी. लोकरे, सुरेश मेटील, अरविंद पाटील, कृष्णात खामकर, सचिन पारखे, प्रवीण पाटील, गजानन गुरव, रणजित वरुटे आदी करत आहेत.