वृत्तसंस्था/ माले
चीन आणि पाकिस्तानसमर्थक कट्टरवाद्यांचा गड ठरलेल्या मालदीवच्या नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये भारताकडून आयोजित योग दिन कार्यक्रमात जमावाने हल्ला केला आहे. कट्टरवाद्यांचा जमाव गुरुवारी सकाळी स्टेडियममध्ये शिरला आणि त्याने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात धुमाकूळ घातला आहे. हा कार्यक्रम भारताचे सांस्कृतिक केंद्र आणि मालदीवच्या सरकारने मिळून आयोजित केला होता. मोठय़ा गोंधळानंतर पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा वापर करावा लागला आहे.
अश्रूधूराचा वापर करण्यात आल्यावर स्थिती अधिकच बिघडली आणि झटापट सुरू झाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मालदीव सरकार या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. पोलीस गालोलहू स्टेडियममधील घटनेची चौकशी करत आहे. या घटनेत हात असलेल्या लोकांना कायद्याला सामोरे जावे लागणार असल्याचे उद्गार मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी काढले आहेत.
स्टेडियमध्ये घुसले समाजकंटक
मालदीवमधील युवा आणि क्रीडा मंत्रालयाने भारताच्या सांस्कृतिक केंद्रासोबत मिळून फुटबॉल स्टेडियममध्ये योग कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान समाजकंटकांचा जमावा हातात काठय़ा आणि झेंडे घेऊन स्टेडियममध्ये शिरला. त्यावेळी लोक योगसराव करत होते. समाजकंटकांचा जमाव योगसराव करत असलेल्या लोकांच्या दिशेने येऊ लागल्यावर पोलिसांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. योगसराव हा सूर्यपूजेप्रमाणेच असल्याचे म्हणत मालदीवमधील कट्टरवाद्यांनी याला विरोध केला आहे.