प्रतिनिधी /जोयडा
प्रत्येक शनिवारी व रविवारी दोन दिवस राफ्टिंग सुव्यवस्थित चालावे यासाठी सरकारकडून केपीसी (कर्नाटक विद्युत निगम) यांना आदेश देण्यात आले आहेत. पण गणेशगुढी येथील केपीसी अधिकारी सुपा धरणातून पाणी सोडत नसल्यामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद ठेवावा लागत आहे. त्यामुळे सरकारचा लाखोचा महसूल बुडत आहे. तसेच रिसॉर्ट, होम स्टे व हॉटेल मालक व राफ्ट एजन्सीकडून नाराजी व्यक्त होत आहे.
जोयडय़ातील गणेशगुडी ते मावळंगीपर्यंत काळी नदीवर सुपा धरणातून पाणी सोडल्याने पर्यटक राफ्टिंग करतात. 15 कि. मी. पर्यंत सुपा धरणातून दररोज पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पर्यटक जोयडा, दांडेली तालुक्यातील 180 हून अधिक रिसॉर्ट व होम स्टे बुकिंग करत राफ्टिंचा आनंद लुटतात. मात्र, कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनचे अधिकारी शनिवारी व रविवारी सुपा धरणातून दिवसा पाणी न सोडता रात्रीच्यावेळी सोडत आहेत. तसेच इतर दिवशी दिवसा पाणी सोडत आहेत. यामुळे रिसॉर्ट व होम स्टे मालकांना लाभ होत नाही. शनिवारी व रविवारी विकेंडला सुटी असल्याने मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडत असून याला केपीसीचे अधिकारीच जबाबदार आहेत.
पर्यटकांकडून बुकिंग रद्द
मागील महिन्यापासून राफ्टिंग सुरू झाले आहे. मात्र, सुपा धरणातून सोमवार ते शुक्रवारी दिवसा पाणी सोडले जात आहे. यामुळे राफ्टिंग बंद ठेवत असल्यामुळे रिसॉर्ट व होम स्टेमधील रुम बुकिंग रद्द केले जात आहेत. त्यामुळे शनिवारी व रविवारी पाणी सोडण्याची मागणी रिसॉर्ट, होम स्टे आणि हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.