स्मृती इराणींसह महिला सदस्यांकडून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. यासंबंधी भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचे पत्र दिल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्मयता आहे.
राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. साहजिकच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे. राहुल गांधींवर काय कारवाई केली पाहिजे, यावर सध्या विचार सुरू आहे. यापूर्वी 2018 मधील विश्वासदर्शक ठरावावेळी भाषण करत असतानाच त्यांनी पंतप्रधानांना आलिंगन दिल्याचा प्रकार घडला होता.
संसदेत यापूर्वी असे वर्तन पाहिले नव्हते : ईराणी
स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांना माझ्याआधी बोलण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी सभागृहातून बाहेर जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केले. महिला सदस्य असलेल्या सभागृहात फ्लाईंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुऊष आहे. असे अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिले नव्हते, असा संताप ईराणी यांनी व्यक्त केला. गांधी घराण्याच्या संस्कारांपैकी हा एक संस्कार आहे हे माहीत नव्हते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधी यांना शिष्टाचार समजत नसल्याचा हल्लाबोल चढवला. राहुल गांधींना काय झालंय? सभागृहात महिला बसलेल्या असताना त्यांना नानाविध प्रकार करण्याचा प्रकार निषेधात्मक असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही याबाबत बोलताना राहुल गांधींना फटकारले. संसदेमध्ये पहिल्यांदाच एखादा खासदार महिलेसमोर फ्लाईंग किस देत आहे. ते कोणते नेते आहेत? आम्ही आज अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केल्याचे त्या म्हणाल्या.