ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकीकडे राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या मुद्यावरुन मोदी सरकारला घेरले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचे मत मांडले आहे. पवारांच्या या भूमिकेवर काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विटद्वारे पवारांवर टीका केली. लांबा यांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यांनी लांबा यांच्या ट्विटचा समाचार घेत थेट राहुल गांधींवरच निशाणा साधला.
“सत्ता येईल, जाईल पण काँग्रेसच्या एका नेत्याने गेले 35 वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या आणि 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या एका ज्येष्ठ नेत्यावर अशा पद्धतीने टीका करावी हे भयावह आहे. राहुल गांधी हे देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासत आहेत”, अशा शब्दात फडणवीसांनी लांबा यांना टोला लगावला.
काय होतं लांबा यांचं ट्विट?
लांबा यांनी शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांचा एकत्र फोटो ट्विट करत “काही भित्रे आणि स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱया चौकीदाराशीही”, असे लांबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.