भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला खासदारांनी बुधवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींनी सभागृहात ‘फ्लाइंग किस’ केल्याबद्दल राहूल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजपने “महिला खासदारांचा अपमान” केल्याचा आरोप करून राहूल गांधी यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि इतर महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे की “राहूल गांधी यांनी अभद्र वर्तन केले आहे आणि भाजप खासदार स्मृती इराणी या सभागृहाला संबोधित करत असताना अयोग्य अशा प्रकारचे हावभाव केले आहे.” असा आरोप केला. तसेच राहूल गांधी यांनी केवळ सभागृहातील महिला सदस्यांच्या प्रतिष्ठेचा अपमानच केला नाही, तर त्यामुळे या सन्माननीय सभागृहाची बदनामी आणि सन्मानही कमी झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
संसद परिसरात बोलताना भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या, “एखाद्या खासदाराकडून सभागृहात अशी वागणूक आपण प्रथमच पाहिली आहे. त्यांनी सभागृहातील महिला खासदारांना फ्लाइंग किसचे हावभाव केले. ते अस्वीकार्य असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सभापतींकडे तक्रार केली आहे.” भाजपच्या आणखी एक खासदार आणि केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी बोलताना म्हटले आहे कि, “राहुल गांधी जात असताना त्यांनी आम्हाला ‘फ्लाइंग किस’ दिले ते आमच्या संस्कृतीच्या विरोधात असून आम्ही संसदेत अशा गोष्टी खपवून घेणार नाही.”