Tarun Bharat

वर्ल्ड कपमध्ये राहुलच सलामीचा जोडीदार असेल

पर्यायी सलामीवीर म्हणून कोहलीचा उपयोग, रोहित शर्माचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/ मोहाली

रोहित शर्मासमवेत सलामीचा जोडीदार म्हणून विराट कोहलीचा पर्याय निश्चित उपलब्ध असला तरी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱया विश्वचषक स्पर्धेत केएल राहुलच आपला सलामीचा जोडीदार राहणार असल्याचे कर्णधार रोहितने रविवारी स्पष्ट करताना कम्फर्ट झोनमधून बाहेर येत कामगिरी उंचावण्यावर भर देण्याचे आवाहनही त्याने आपल्या संघसहकाऱयांना केले.

मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने वरील प्रतिपादन केले. संघातील प्रत्येक खेळाडूची भूमिका संघव्यवस्थापनाने निश्चित केली असल्याचेही तो म्हणाला. या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने होणार असून त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडे विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

‘मी आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या संदर्भात चर्चा केली असून विराट हा आमचा तिसरा सलामीवीर असल्याने काही सामन्यात आम्ही त्याला सलामीला खेळवत आलो आहोत. आशिया चषकातील शेवटच्या सामन्यात त्याने ही भूमिका पार पाडली होती आणि त्यात त्याने चांगले प्रदर्शन केल्याने आम्ही खुश आहोत. तो आपला बॅकअप सलामीवीर आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलच आपला सलामीचा जोडीदार असेल,’ असे रोहित यावेळी म्हणाला. अफगाणविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात कोहलीने सलामीस येत नाबाद शतक नोंदवत गेल्या तीन वर्षातील आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळही संपवला. त्याचे हे टी-20 मधील पहिले आणि एकूण 71 वे आंतरराष्ट्रीय शतक होते.

‘राहुलच माझ्यासोबत सलामीला येईल. कारण या जागेसाठी आता आम्ही आणखी प्रयोग करणार नाही. त्याने या जागेवर लक्षवेधी परफॉर्मन्स केला असून तो आपल्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. गेल्या दोन-तीन वर्षातील त्याची कामगिरीही समाधानकारक झाली आहे. प्रत्येक खेळाडूला निश्चित जबाबदारी दिली असल्याने त्यांच्या स्थानाबाबत कोणताही गोंधळ नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो,’ असे तो म्हणाला.

राहुलच्या स्ट्राईकरेटबाबत अलीकडे अनेक शंका उपस्थित केल्या जात असून आशिया चषक स्पर्धेत कोहलीला सूर सापडल्याने रोहितसमवेत सलामीला कोण खेळणार, या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘राहुलची क्षमता आम्ही जाणून आहोत, तोही आमच्यासाठी एक मॅचविनर आहे. आम्ही बॅकअप सलामीवीर निवडलेला नाही. पण गरज पडल्यास विराट ही भूमिका पार पाडू शकतो. आयपीएलमध्ये आपल्या प्रँचायझीसाठी गेली बरीच वर्षे त्याने ही भूमिका पार पाडलेली आहे,’ असेही रोहितने स्पष्ट केले.

भारतीय व ऑस्ट्रेलियन संघांचा सराव

मंगळवारी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना होणार असून भारतीय संघाने त्यासाठी रविवारी सरावाला सुरुवात केली. या मालिकेतील दुसरा सामना 23 रोजी नागपूरमध्ये, तिसरा व शेवटचा सामना 25 रोजी हैदराबादमध्ये खेळविला जाईल. सर्व खेळाडू नेट प्रॅक्टिसमध्ये गुंतल्याचे दिसून येते होते. या सराव सत्रात कोहली, केएल राहुल, अष्टपैलू हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कर्णधार रोहित शर्मा व रिषभ पंत उपस्थित होते.

आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यात अपयश आल्यानंतर भारताने आता वर्ल्डकपकडे लक्ष केंद्रित केले असून या मालिकेनंतर द.आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे व तीन टी-20 सामने होणार आहेत. 28 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी या मालिका भारतासाठी उपयुक्त ठरणार आहेत. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघानेही सराव रविवारी केला.

Related Stories

गोलंदाज अली खान एकही चेंडू टाकण्यापूर्वीच बाहेर

Patil_p

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी महिला क्रिकेट संघाची घोषणा

Rohit Salunke

बांगलादेशचा श्रीलंका दौरा लांबणीवर

Patil_p

बांगलादेशला नमवित भारत उपांत्य फेरीत

Patil_p

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आकर्षी कश्यप उपांत्य फेरीत

Patil_p

न्यूझीलंडची वनडे मालिकेत विजयी सलामी

Patil_p