इचलकरंजीचे पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी केली कारवाई : जुगारासाठी बंगल्याची खोली भाड्याने देणारा बंगला मालक, जुगार अड्डा चालकासह अकरा जण अटकेत : रोख रक्कम ८ हजार ४७० रुपये, ७ मोबाईल हॅण्डसेट, ६ दुचाकी, जुगाराचे साहित्य असा ३ लाख ४ ९ हजार ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ इचलकरंजी
खोतवाडी ( ता. हातकणंगले ) येथील अष्टविनायकनगरातील एका बंगल्यात सुरु असलेल्या बेकायदेशिर जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात बंगला मालक, जुगार अड्डा चालकासह अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ८ हजार ४७० रुपयांची रोकड, ७ मोबाईल हॅण्डसेट, ६ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा ३ लाख ४ ९ हजार ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजीचे पोलीस उपाअधीक्षक बाबूराम महामुनी यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री उशिरा केली.
पोलिसांनी अटक केलेल्यांच्यामध्ये बंगला मालक गौस गणी मुजावर (रा. अष्टविनायकनगर, खोतवाडी ), अड्डा चालक संतोष चव्हाण (रा. बेघर वसाहत यड्राव, ता. शिरोळ ) यांच्यासह भाऊसो विठ्ठल सुर्यवंशी, राजू आण्णासो पाटील, किरण रमेश जाधव, बाबासो भाऊसो देसाई, श्रीकांत नामदेव पवार (सर्व रा. तारदाळ), संदिप बाळासाहेब खोत (रा. खोतवाडी ), भारत निवृत्ती जाधव (रा. तोरणानगर, शहापूर), आण्णासो शंकर हिंगमिरे (रा. निमशिरगाव रोड, तारदाळ ), औरंग मौला शेख (रा. बेघर वसाहत, यड्राव ) याचा समावेश आहे
खोतवाडी , अष्टविनायकनगरातील गौस मुजावर यांच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत त्रिमुर्ती कला , क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली बेकायदेशिर जुगार अड्डा सुरु होता . यांची माहिती पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांना बातमीदाराकडून समजली. त्यावरुन त्यांनी या जुगार अड्यावर आपल्या विशेष पथकाकरवी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला . या छाप्यात जुगार खेळत असलेल्या आठ जणासह बंगला मालक , जुगार अड्डा चालक संतोष चव्हाण, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष औरंग शेख अशा अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ हजार ४७० रुपयांची रोकड ७ मोबाईल हॅण्डसेट, ६ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा ३ लाख ४ ९ हजार ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, यांची फिर्याद निर्भया पथकाचे कॉन्स्टेबल लक्ष्मण मुढे यांनी दिली आहे.