अभिनेता सिद्धांत कपूरसह पाच जणांना अटक ः ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी बेंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळूरच्या हलसूर येथील ‘द पार्क’ नामक पंचतारांकीत हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून या बडय़ा पार्टीवर छापा टाकला. यावेळी सिद्धांत कपूरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचा सुगावा लागल्याने छापा टाकण्यात आला. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱयांसह 25 पोलीस सहभागी होते. पार्टीत 50 जण सहभागी होते. त्यातील अनेक जण सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी 35 जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत सिद्धांत कपूरसह पाच जणांनी ड्रग्ज सेवन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना हलसूर पोलीस स्थानकात नेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती बेंगळूर पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
हलसूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी मध्यरात्री 12 वाजता ही कारवाई करण्यात आली. पार्टी चाललेला भाग सील करण्यात आला आहे. या ठिकाणी कचऱयाच्या डब्यात 5 गॅम गांजा, एमडीएमच्या 7 गोळय़ा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्टीवेळी अनेकजण नशेमध्ये नाचत होते. त्यामुळे 50 जणांना टीटी वाहनातून वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात सिद्धांतचाही समावेश होता. सध्या 35 जणांचे अहवाल आले आहेत. त्यामध्ये 5 जणांनी ड्रग्ज सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सिद्धांत कपूरसह अखिल सोनी, अजोद सिंग, अखिल अनी, दर्शन सुरेश यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 15 जणांचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. अटकेतील आरोपी मूळचे केरळ, पंजाब आणि बेंगळूरमधील रहिवासी आहेत.
अभिनेता सिद्धांत कपूरच्या अटकेमुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली आहे. यापूर्वी मागील वर्षी मुंबईत आलिशान जहाजात रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान आला अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास झाल्यानंतर त्याला क्लिन चीट मिळाली होती.
सिद्धांत कपूर याने 1997 मध्ये ‘जुडवा’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. ‘हसीना पारकर’, ‘पलटन’, ‘हॅलो चार्ली’ आणि ‘चेहरे’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्याची कारकिर्द म्हणावी तितकी यशस्वी ठरलेली नाही. त्याने वेबसिरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.
कोट्स…
गंभीरपणे दखल
बेंगळूरमधील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीची पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत कपूर याच्यासह पाचजणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्व संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री