जिल्हा पोलीस प्रमुख विशेष पथक व गांधीनगर पोलिसांची संयुक्त कारवाई
उचगाव / वार्ताहर
सरनोबतवाडी ता.करवीर येथे अवैधरित्या सुरू असणाऱ्या ‘द व्हाईट रॅबिट कॅफे अँड मोअर’ या हुक्का पार्लरवर जिल्हा पोलीस अधीक्षक पथक आणि गांधीनगर पोलीसांनी छापा टाकला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास केली. या कारवाईत ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम रामराव भोसले, अभयसिंह उदयसिंह भोसले दोघे रा. सरनोबतवाडी, अनिल चंद्रकांत व्हटकर रा. जरगनगर कोल्हापूर, ओंकार प्रकाश पाटील रा. टिंबर मार्केट कोल्हापूर, सुरज सुनील कुडचिकर रा. शाहूपुरी कोल्हापूर, रोहित अमर सुतार रा. कदमवाडी, प्रवीण शंकर बावचे रा. शिवाजी पेठ कोल्हापूर, सिद्धराज शिवाजी तरंगे रा. मणेरमळा उचगाव, रोहित रवींद्र कांबळे रा. गारगोटी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सरनोबतवाडी ता. करवीर येथील मनीषा कॉलनीत प्रेम रामराव भोसले यांच्या घराजवळ द व्हाईट रॅबिट कॅफे नावाचा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती खबर्यामार्फत विशेष पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने आणि गांधीनगर पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा टाकला. हुक्यासाठी लागणारे हुक्का पॉट, विदेशी मद्य, हुक्का फ्लेवर असा एकूण ३१ हजार १८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. हुक्का पिणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आकाश संभाजी पाटील यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास गांधीनगरचे सपोनि सत्यराज घुले करत आहेत.