प्रदूषण नियंत्रण मंडळ-महापालिकेची कारवाई : प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची आकारणी
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने जोरदार आघाडी उघडली आहे. शुक्रवारी शहरातील विविध मॉलमध्ये आणि दुकानांमध्ये धाडसत्र राबवून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तसेच प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची आकारणी करून प्लास्टिक वापर बंद करण्याची सूचना करण्यात आली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच जनजागृती उपक्रम राबवून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. सिंगल युज प्लास्टिकचा साठा करणे, विक्री करणे व वापर करण्यावर बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर केल्यास किंवा विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
सात दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक विरोधी मोहीम शुक्रवारपासून हाती घेतली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत शहरातील मॉल लक्ष्य करण्यात आले. विशेषतः या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसाठी पैसे आकारले जातात. तसेच मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असतो. त्यामुळे टिळकवाडी, शहापूर भागात असलेल्या बडय़ा मॉलवर धाड टाकून प्लास्टिकचा साठा जप्त केला. यावेळी प्रत्येकी 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच काही बडय़ा दुकानांमध्ये धाड टाकून प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेण्यात आला. यापुढे प्लास्टिकचा वापर टाळावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश आय. एच., महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते प्रवीण खिल्लारी, महसूल निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व मनपाचे कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी होते.