कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने फूटपाथवरील खोकी हटविली
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाचे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानिमित्त रेल्वेस्टेशन रोडवर फूटपाथवर थाटण्यात आलेले स्टॉल हटविण्यात आले. यामुळे बऱ्याच वर्षांनंतर रेल्वेस्टेशन रोडवरील फूटपाथने मोकळा श्वास घेतला. रेल्वेस्टेशन व कारवार बसस्टँडच्या समोरील भागात अनेक खोकीधारकांनी फूटपाथवर अतिक्रमण केले होते. दोन महिन्यांपूर्वी रेल्वेस्टेशन अधिकाऱ्यांनी व पॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांनी स्टेशनसमोरील खोकी हटविली. परंतु हे खोकीधारक हेस्कॉम कार्यालयाजवळ असणाऱ्या फूटपाथवर ठाण मांडून होते. चहाचे स्टॉल, नाश्ता, ट्रॅव्हल्स बुकिंग यासह इतर स्टॉल मांडण्यात आले होते. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालत जावे लागत होते. अनेकवेळा सूचना करूनही स्टॉल हटविण्यात आले नव्हते. परंतु रेल्वेस्थानकाचे उद्घाटन होणार असल्याने या मार्गावरील सर्व स्टॉल हटविण्यात आले. यामुळे पहिल्यांदाच या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. परंतु उद्घाटनानंतर पुन्हा खोकेधारक स्टॉल मांडणार नाहीत, याची खबरदारी पॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.