प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी-विन्हेरे स्थानकादरम्यान गुरुवारी रात्री 1 च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक 5 तास विस्कळीत झाली. याचा परिणाम रात्री धावणाऱया 8 रेल्वेगाडय़ांवर झाला. मुंबईहून येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्थानकात 5 तास रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले. ओव्हरहेड वायरची जोडणी केल्यानंतर शुक्रवारी पहाटे 6 वा. मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते ठोकूरदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी रेल्वेगाडय़ा डिझेलऐवजी विजेवर चालवण्यात येत आहेत. दिवाणखवटी-विन्हेरेनजीक तुटलेल्या ओव्हरहेड वायरचा पहिला फटका कोकण रेल्वेला बसला. या बिघाडामुळे विजेवर धावणाऱया रेल्वेगाडय़ांना कोकण रेल्वेने डिझेल इंजिनची उपलब्धता करून देत त्या मार्गस्थ केल्या. 25 हून अधिक वीज कर्मचाऱयांनी शुक्रवारी पहाटे 6 वाजेपर्यंत तुटलेली ओव्हरहेड वायरची जोडणी केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
या बिघाडामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया 8 रेल्वेगाडय़ाच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला. मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसची वीर स्थानकात तब्बल 5 तास रखडपट्टी झाली. मुंबईहून येणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सापेवामणे स्थानकात साडेचार तास थांबवण्यात आली. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसलाही याच स्थानकात थांबा देण्यात आला. मंगळूर एक्स्प्रेस दिवाणखवटी स्थानकात साडेचार तास तर मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल 9 तासांनी ठाणे स्थानकात पोहचली.
तुतारी एक्स्प्रेस 4 तास तर मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मडगाव-नागपूर स्पेशल, मडगाव-एलटीटी एक्स्पेस, मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस गाडय़ा 5 तास उशिरानेच धावल्या. यामुळे या एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे प्रवासी रात्रभर त्या-त्या स्थानकात अडकून पडले. या बिघाडाचा शुक्रवारी धावणाऱया मांडवी एक्स्प्रेसलाही फटका बसला. ही एक्स्प्रेस सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून मार्गस्थ झाली. याशिवाय अन्य रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.
उद्योगमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांनाही फटका
कोकणकन्या एक्स्प्रेसमधून कोकण दौऱयावर येणाऱया उद्योगमंत्री उदय सामंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या बिघाडाचा फटका बसला. उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी जिल्हा दौऱयावर येणार होते. त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला.