कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी
पुणे / प्रतिनिधी :
मागच्या चार दिवसांपासून राज्यभर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारीही महाराष्ट्राच्या अनेक भागांत हजेरी लावली. मात्र, काही भागांत पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. दरम्यान, पुढच्या चार दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस होणार असून, मध्य महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला.
जूनमध्ये ओढ देणाऱ्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ात राज्याला दिलासा दिल्याचे दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह सर्वदूर पाऊस होत असल्याचे चित्र आहे. मागच्या 24 तासांतही राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर काही ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. विदर्भातील अनेक जिल्हय़ांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली.
हेही वाचा : टंकलेखन परीक्षा उत्तीर्णतेसाठी दोन वर्षांची मुदतवाढ
शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत पुण्यात 3, लोहगाव 1, नगर 3, कोल्हापूर 5, महाबळेश्वर 71, नाशिक 50, सांगली 4, सातारा 2, सोलापूर 18, मुंबई 1, अलिबाग 1, रत्नागिरी 6, डहाणू 3, परभणी 11, अकोला 9, बुलढाणा 2, नागपूर 8, तर वर्ध्यात 3 मिमी पावसाची नोंद झाली.
कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज
कोकणात पुढच्या चार दिवसांत बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही पुढच्या चार दिवसात मुसळधार वा जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस हेईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे