सत्तरीत पावसाची संततधार, अनेक नरकासुर प्रतिमा भिजल्या, ताडपत्रीच्या आच्छादनाचा आधार
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयाच्या सर्वच ग्रामीण भागात नरकासुर प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस लागत आहे. यामुळे सध्या नरकासुर प्रतिमा ताडपत्रीच्या आच्छादनाखाली आकार घेऊ लागल्या आहेत. अनेक गावातील नरकासुर प्रतिमा भिजल्या असून त्या पुन्हा तयार करण्यासाठी युवावर्ग कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.
सत्तरीतील अनेक भागांमध्ये नरकासुर प्रतिमा तयार करण्यासाठी तरुणांनी कंबर कसलेली आहे. पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस लागत आहे. या पावसाचे प्रतिकूल परिणाम नरकासुर प्रतिमा तयार करण्याच्या कामावर होत आहे. यामुळे तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे. अनेकांनी तयार केलेल्या नरकासुर प्रतिमा पावसामध्ये भिजल्याची माहिती मिळाली आहे.
पावसामुळे कामात वारंवारपणे व्यत्यय
पंधरा दिवसापासून नरकासुर प्रतिमा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र पावसाचा व्यत्यय वारंवारपणे येत आहे. अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमा भिजल्या आहेत. मात्र आनंदावर विरजण पडणार नाही यासाठी अनेकांनी नरकासुराच्या प्रतिमेवर ताडपत्रीचे आच्छादन घातलेले आहे, असे ग्रामीण भागातील तरुणांनी सांगितले.
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये नरकासुर प्रतिमा स्पर्धा तसेच आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अनेक संस्थानी पर्यावरणीय दिवाळी साजरी करण्यावर भर दिला असून आकाश कंदील स्पर्धा या पूर्णपणे पर्यावरणीय राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केलेले आहे.