Tarun Bharat

पुन्हा पावसाचा इशारा

हवामान खात्याने पुन्हा एकदा चक्रीवादळाचा आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा, गहू, हरभरा पिके यांना तडाखा बसेल असा अंदाज व्यक्त करणारा हा इशारा व्यक्त झाला आहे. ‘मंदौस’ नावाचे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आकारले आहे. ते पाँडिचेरी मार्गे घोंगावत महाराष्ट्रात येणार आहे व येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा पाऊस म्हणजे निसर्गाचा तडाखाच ठरणार आहे. ऐन थंडीच्या दिवसात होणारा हा अवकाळी पाऊस गहू-हरभरा या रब्बी पिकांसाठी पोषक नाही आणि द्राक्षासह पपई, बोर, पेरु, संत्री या फळबागांनाही उपयुक्त नाही हे स्पष्ट आहे. मंद्रौस या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती.  पण नाव सोनुबाई ही म्हण सार्थ करणारे हे मंद्रौस अवकाळी तडाखा देऊन होत्याचे नव्हते करते काय अशी भीती आहे. खरे तर नोव्हेंबर-डिसेंबर उत्तम थंडी पडली पाहिजे, कडाक्याच्या थंडीत रब्बी हंगाम विशेषतः गहू, हरभरा चांगला पिकतो. शिवाय हा मौसम अग्निप्रदीपन करणारा असल्याने भूक चांगली लागते व याकाळात व्यायाम केला तर प्रकृती उत्तम राहते. थंडी पडली तर गहू-हरभरा एकरी उत्पादन समाधानकारक येते पण गेले काहीवर्षे हवामान सातत्याने बदलते आहे. सकाळी थंडी, दुपारी पाऊस, रात्री उकाडा असे तिन्ही ऋतु एकाच दिवशी अनुभवण्याचे प्रसंग वारंवार येत आहेत. बदललेले हवामान, वाढलेले तापमान, ढासळलेला निसर्गाचा समतोल या सर्वांचे मानवी जीवनावर आणि शेती उद्योगावर वाईट परिणाम होत आहेत. नुकतीच एक आकडेवारी आली आहे ती नव्याने सर्वाच्या डोळय़ात अंजन घालणारी आहे. आपण पर्यावरणाचा किती ऱहास केला आहे आणि करतो आहोत यांचे मोजमापच या आकडेवारीतून पुढे आले आहे. जागतिक पातळीला तापमान वाढ, युद्धे आणि पर्यावरणाची अवहेलना सुरु आहेच पण आपण आपल्या परिसरातही जागृत नाही. ओघानेच यांचे फटके आपणास बसत आहेत. मुंबईतील आणि महानगरातील हवामान बिघडल्याच्या वार्ता नित्याच्या झाल्या आहेत. आपल्या परिसरातील पर्यावरणासाठी पश्चिम घाट महत्वाचा मानला जातो. जैवविविधता, वन्यप्राणी, पक्षी, वनराजी यामुळे पश्चिम घाटाला विशेष महत्व आहे. पण सुधारणा, विकास या नावाखाली भौतिक सुख-सोयीसाठी पर्यावरण ऱहास सुरु आहे. ओघानेच बिबटे शहरात दिसू लागले आहेत. हत्तीचे कळप धुडगूस घालतात आणि शहरातील चिमण्या परागंदा झाल्या आहेत. पक्षी, फुलपाखरे, माशा नसल्याने परागीकरण अडचणीत आहे. केंद्र सरकारने सन 2013 मध्ये एक समिती नेमून पश्चिम घाटातील सुमारे साठ हजार चौरस किलोमीटर परिसर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. केरळ, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा या राज्यात या क्षेत्राशी थेट संबंध होता. पण या राज्यातून त्याला विरोध सुरु झाला आणि हे क्षेत्र साठ हजारवरुन 56 हजार चौरस किलोमीटर इतके कमी करण्यात आले. पश्चिम घाट लुटण्यासाठी आणि तेथील खनिजे व वन्यसंपत्ती लुबाडण्यासाठी धनदांडगे, सत्तादांडगे नेहमीच सरसावलेले असतात. ओघानेच पश्चिम घाट अडचणीत आहे. आता हे संवेदनशील क्षेत्र आणखी कमी करा, अशी हाकाटी उठवण्यात आली आहे. पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आहे. दुर्मिळ वृक्ष, वनस्पती, फुले, प्राण्यांच्या विविध जाती, विविध पक्षी असा समृद्धतेने नटलेला पश्चिम घाट अडचणीत आहे. संवेदनशील क्षेत्र आणखी कमी केले तर तापमानवाढ आणखी होईल आणि निसर्ग कोप होईल हे वेगळे सांगायला नको. एकूणच पैशामागे लागलेला समाज पर्यावरण ऱहास करतो आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे आणि जागतिक पातळीवरही विकसित व विकसनशील देशांनी पर्यावरण रक्षण आणि प्रदुषण विरहित पाणी, हवा, जमीन यासाठी पावले उचलली पाहिजेत. भारतात ‘सहा ऋतुचे सहा सोहळे, अवघे भान हरावे’ असे वातावरण असते पण गेली काही वर्षे ढगफुटी, अवकाळी हेच सर्वांच्या वाटय़ाला येते आहे. यंदा मान्सून लांबला आणि परतीचा पाऊस रेंगाळला त्यामुळे रब्बीच्या पेरण्या उशीरा झाल्या. चार-सहा दिवस थंडी पडली, मेटाकुटीला आलेला शेतकरी रब्बी पिकावर आशा ठेऊन होता आहे पण अवकाळीचा पाऊस त्यांच्या स्वप्नभंग करणार अशी भीती आहे. महाराष्ट्रात सध्या बाष्पयुक्त वारे आणि ढगाळ वातावरण आहे. तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. 11 ते 14 डिसेंबर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे वादळ उपसागरातच थंड व्हावे तसे झाले तर संकट टळेल पण नाताळ आणि ख्रिसमससाठी द्राक्षपेटय़ा विदेशात निर्यात करायच्या म्हणून जीवाची बाजी लाऊन द्राक्षशेतीत काम करणाऱया शेतकऱयांसह सर्वांना फटका बसणार आहे. पावसाचा, हवामानाचा आणि हंगामाचा कोणताच अंदाज लागत नसल्याने शेती व शेतकरी संकटात सापडतो आहे. चिपकोसारखी आंदोलने आणि आपली परंपरागत वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, पळस असे वृक्ष लागले पाहिजेत. चिमण्या, कावळे, पक्षी-प्राणी जपले पाहिजेत. दुर्मिळ वनस्पती, प्राणी यांचे संगोपन केले पाहिजे हे केले तरच निसर्ग साथ देणार आहे. पर्यावरण राखले जाणार आहे. शुद्ध पाणी आणि मोकळा श्वास सहज, साध्य होणार आहे. गावपण, घरपण, कृषी संस्कृती जपली पाहिजे. निरीक्षक, शास्त्रज्ञ आणि तज्ञ वारंवार इशारा देत आहेत. पण सुधारणा होत नाही आणि डिसेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज थरकाप उडवतो, स्वप्नाचा चक्काचूर करतो. सर्वांनी यातून बोध घेतला पाहिजे. त्याच जोडीला सरकारी पातळीवर आणि धोरणकर्त्यांनीही पावले उचलली पाहिजेत. वेळ निघून जायच्या आत निर्णय व अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर अशी अवकाळी आणि ढगफुटी होणार असेल तर पुरेशी तयारी केली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान याचा वापर पर्यावरण रक्षणासाठी, मानवकल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी केला पाहिजे.

Related Stories

शिवशाहीरांचे शतक

Amit Kulkarni

गणेशोत्सवाचा आनंद घेताना..!

Patil_p

ट्रम्प काळातील अमेरिकन अर्थव्यवस्था

Patil_p

मी सध्या काय करतो

Patil_p

चिपळुणातील पूररेषेचा प्रश्न जटील

Patil_p

संभाजीराजेंची लढाई

Patil_p