एका दिवसात 9 इंच पावसाची नोंद, रस्ते जलमय, दरडी कोसळण्याचे प्रकार, कित्येकांच्या घरांत पाणी शिरले
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात पावसाने एकसारखे थैमान माजविले असून 8 रोजी एकाच दिवसात या तालुक्यात 9 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. मागच्या जवळजवळ 40 वर्षांतील हा विक्रम असल्याची माहिती मामलेदार कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे काणकोण तालुक्यातील तळपण, गालजीबाग आणि अन्य नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या असून तळपण नदीतील पाण्याची पातळी 6.9 मीटर इतकी झाली आहे. अवघ्या एकाच दिवसात ही पातळी 1 मीटरने वाढली असल्याची माहिती नदी परिवहन खात्याने दिली.
सतत पडत असलेला पाऊस, दर्याला आलेले उधाण यामुळे होवरे, पाळोळे, मणगण, पाटणे हा भाग जलमय झाला आहे. काहींच्या घरांत पाणी घुसले आहे. पाटणे येथील रतन दयानंद पागी यांच्या घरासमोर साचलेल्या पाण्यामुळे घरात जाण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीजखांबे मोडून पडले आहेत आणि वीजवाहिन्या तुटून पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पैंगीण येथील हाद दुरिग येथील नाल्याच्या ठिकाणी आणि पैंगीण ते महालवाडा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हा भाग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. पाण्याच्या प्रवाहाची दिशा अकस्मात बदलल्यामुळे शेतीजवळ असलेल्या घरात पाणी घुसले आहे. मुठाळ, सादोळशे, करमल घाट येथे दोन-तीन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व भागांची उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी पाहणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी गावकर यांनी काणकोण आपत्कालीन व्यवस्थापन समितीची तातडीने बैठक बोलावून काणकोणच्या सर्व प्रशासकीय विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. या बैठकीला काणकोण आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर, मामलेदार मनोज कोरगावकर, गटविकास अधिकारी अनिल नाईक, अग्निशामक दलाचे रवींद्रनाथ पेडणेकर, वीज खात्याचे साहाय्यक अभियंता अनुप राणे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व विभागांचे प्रमुख, पालिका मुख्याधिकारी मधू नार्वेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.