ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लीलावती रुग्णालयात आज त्यांच्या पायावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राज ठाकरे यांना पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी काल मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. कोरोना डेड सेलमुळे ॲनेस्थेटिया देता येत नाही, त्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ठाकरेंच्या पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली.
राज ठाकरे यांनी गुडघा आणि पाठीचा त्रास दूर करण्यासाठी 1 जूनला पायावर शस्त्रक्रिया करणार असल्याचं पुण्यातील सभेत सांगितलं होतं.
या शस्त्रक्रियेसाठीच त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे कारण दिले होते.
दरम्यान, राज ठाकरे यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. 22 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.