पुणे / प्रतिनिधी :
‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इतिहास अभ्यासक गजानन मेंहदळे (Gajanan Mehndale) यांची भेट शनिवारी भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास मोडतोड करून चुकीचा दाखवण्यात आला आहे, असा थेट आरोप संभाजी राजे यांनी केला होता. त्यासोबत आगामी चित्रपट ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटावरदेखील त्यांनी आक्षेप नोंदवला होता. या भूमिकेनंतर राज्यात ‘हर हर महादेव’चा शो बंद करण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने घेतली होती. त्याचा विरोध करत मनसेने पुन्हा एकदा शो सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर राज यांनी घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली.
या भेटीबाबत बोलताना इतिहास अभ्यासक मेहेंदळे म्हणाले, राज ठाकरे आमची भेट घेण्यासाठी पूर्वीही येत असत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हयात असताना ते त्यांची भेट घेतल्यानंतर माझी भेट घेत असायचे. राज ठाकरे यांना शिवकालीन इतिहासाबद्दल कुतुहल आहे. म्हणून ते सातत्याने त्यांचे प्रश्न आमच्याकडून जाणून घेत असायचे. आजदेखील त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत दहा प्रश्न माझ्याकडून जाणून घेतले, अशी माहिती इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांनी दिली.
राज यांच्या पुढील भूमिकेबद्दल औत्सुक्य
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा व्हॉइस ओवर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र, राजकारणात हे खटके उडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चित्रपटाविषयी भूमिका मांडण्यास स्पष्ट मनाई केली. योग्य वेळी मी आपले मत मांडेन, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. आता मेहेंदळे यांच्या भेटीनंतर भविष्यात राज आपली भूमिका काय मांडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.