पुणे / प्रतिनिधी :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, आगामी अयोध्या दौरा, नियोजित सभेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता पुण्यातही राज गर्जना होणार असल्याचे संकेत असल्याचे स्पष्ट होत आहे. 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात राज ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती समोर आली असून, या सभेसाठी मनसेकडून पोलिसांकडे पत्र देत परवानगी मागण्यात आली आहे.
राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय मनसेच्या रविवारी पार पडलेल्या मेळाव्याबाबतही राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, त्यादृष्टीनेही पुणे भेटीकडे पाहिले जात आहे. पुण्यामध्ये जाहीर सभा घेण्याची चर्चादेखील पुणे मनसेमध्ये जोरदार सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकापाठोपाठ एक सभा पार पडल्या. मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेऊन आपल्यावरील टीकेचा समाचार घेतील, असे बोलले जात आहे.