नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर विचारमंथनाची फेरी पुढील एक-दोन दिवस चालणार आहे. याच क्रमाने काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किशोर यांनी गेहलोत आणि बघेल यांच्यासमोर आपली रणनीती मांडली. दोघांनीही सूचना केल्या. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, ज्ये÷ नेते अंबिका सोनी आणि सुरजेवाला उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या सूचनांमध्ये काँग्रेस संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि येत्या निवडणुकीत संघटना सुरळीत करण्यासाठी आणि संघटनात्मक बदल करण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून या सूचनांवर सखोल चर्चा सुरू असल्याचे सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले. पक्षसंघटना अधिक प्रभावी करण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या सूचना घेणे आवश्यक असल्याने त्यांच्याशी चर्चा झाल्याचे ते पुढे म्हणाले.