आयपीएल हंगामात जोस बटलरचे विक्रमी तिसरे शतक, अवघ्या 65 चेंडूत 9 चौकार, 9 षटकारांसह 116 धावांची आतषबाजी
मुंबई / वृत्तसंस्था
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक, नाटय़मय आयपीएल साखळी लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी धोबीपछाड दिला. विजयासाठी शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 षटकारांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने सलग 3 षटकार खेचत एकच खळबळ उडवून दिली. पण, तिसरा चेंडू उंचीच्या निकषावर नोबॉल असतानाही नोबॉल दिला गेला नसल्याचा ठपका ठेवत दिल्लीने निषेध नोंदवला आणि पुढे सामना पूर्ण होत राजस्थानने विजय मिळवला असला तरी त्यांच्या विजयाला या वादाचे गालबोट लागले.
प्रारंभी, बटलरच्या हंगामातील तिसऱया शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात दिल्लीला 20 षटकात 8 बाद 207 धावांवर समाधान मानावे लागले.
या लढतीत दिल्लीला शेवटच्या 2 षटकात 36 धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाने चक्क निर्धाव षटक पूर्ण केले आणि यामुळे शेवटच्या षटकात 36 धावांची गरज असे नवे समीकरण निर्माण झाले. त्यानंतर रोव्हमन पॉवेलच्या फटकेबाजीने सामन्यात रंग भरला. पण, दिल्लीकरांना नोबॉल न देण्याचा एक निर्णय रुचला नाही आणि त्यावरुन सामन्यात काही मिनिटे खेळही ठप्प झाला. पुढे सामना सुरु झाला, त्यावेळी दिल्लीच्या फलंदाजांची लय बिघडली होती आणि त्यांना अंतिमतः हा सामना 15 धावांनी गमवावा लागला.
शेवटच्या 3 चेंडूत 3 षटकार आवश्यक असताना पॉवेलला चौथ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही, पाचव्या चेंडूवर दोनच धावा निघाल्या आणि शेवटच्या चेंडूवर पॉवेल यष्टीरक्षक सॅमसनकरवी झेलबाद झाला.
बटलरची चौफेर फटकेबाजी
तत्पूर्वी, जोस बटलरने सध्याच्या हंगामातील तिसरे शतक झळकावल्यानंतर राजस्थानने 2 बाद 222 धावांचा डोंगर रचण्यात यश मिळवले. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म अनुभवणाऱया बटलरने अवघ्या 65 चेंडूत 9 चौकार व 9 षटकारांसह 116 धावांची आतषबाजी केली. शिवाय, सहकारी सलामीवीर देवदत्त पडिक्कलच्या साथीने 15.1 षटकातच 155 धावांची सलामी दिली. पडिक्कलने 35 चेंडूत 54 धावांची आतषबाजी करत बटलरला समयोचित साथ दिली. पडिक्कलच्या खेळीतही 7 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर सलामी जोडीने 6.5 षटकात पहिले अर्धशतक साजरे केले आणि त्यानंतर त्यांची फलंदाजी आणखी खुलत गेली. बटलरने जलद गोलंदाजीचा समाचार घेतल्यानंतर कुलदीप यादव व अक्षर पटेल या फिरकी द्वयीला चांगलेच झोडपून काढले. या दिग्गज फलंदाजाने आपले पहिले अर्धशतक अवघ्या 36 चेंडूत साजरे केले. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाचा उत्तम समाचार घेत या जोडीने अगदी मनमुराद, चौफेर फटकेबाजी केली. पडिक्कलने देखील 31 चेंडूत चौकारासह अर्धशतक साजरे केले.
हंगामात यापूर्वीच दोन शतके झळकावलेल्या बटलरने येथेही आपला बहारदार फॉर्म कायम राखताना गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले. या उभयतांच्या पॉवर हिटिंगसमोर दिल्लीच्या गोलंदाजांकडे काहीच पर्याय नव्हता. दिल्लीच्या गोलंदाजांनी सर्व आशा सोडल्यानंतर अखेर 16 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्याला खलील अहमदने पायचीत केले. अर्थात, तोवर बराच उशीर झाला होता.
शतकवीर बटलर 19 व्या षटकात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात लाँगऑनवरील वॉर्नरकडे सोपा झेल देत बाद झाला. डावातील उत्तरार्धात संजू सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत 46 धावांची आतषबाजी केल्यानंतर राजस्थानला या बळावर 200 धावांचा टप्पा सहज सर करता आला. 20 षटकात 2 बाद 222 ही या हंगामातील सर्वोच्च धावसंख्याही ठरली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 2 बाद 222 (जोस बटलर 65 चेंडूत 9 चौकार, 9 षटकारांसह 116, देवदत्त पडिक्कल 35 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 54, संजू सॅमसन 19 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 46, हेतमेयर नाबाद 1. अवांतर 5. खलील अहमद 1-47, मुस्तफिजूर 1-43).
दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकात 8 बाद 207 (रिषभ पंत 24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 44, पृथ्वी शॉ 27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 37, ललित यादव 24 चेंडूत 37, रोव्हमन पॉवेल 15 चेंडूत 5 षटकारांसह 36. अवांतर 13. प्रसिद्ध कृष्णा 3-22, रविचंद्रन अश्विन 2-32, मकॉय, चहल प्रत्येकी 1 बळी).
आतापर्यंतचा हंगाम…फक्त बटलरचा!
सर्वाधिक धावा ः जोस बटलर (491)
सर्वाधिक अर्धशतके ः जोस बटलर (5)
सर्वाधिक शतके ः जोस बटलर (3)
सर्वाधिक षटकार ः जोस बटलर (32)
सर्वाधिक चौकार ः जोस बटलर (41)
जेव्हा पंतने आपल्या दोन्ही फलंदाजांना परत बोलावले!
ओबेड मकॉयचा कमरेच्या उंचीइतका तिसरा चेंडू पॉवेलने मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग षटकारासाठी पिटाळून लावला, त्यावेळी दिल्लीच्या पथकात उत्साहाला उधाण आले. शिवाय, तितक्याच तत्परतेने नोबॉल देण्यासाठी हातवारेही केले. पण, मैदानी पंचांनी तो चेंडू रितसर ठरवल्याने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आपल्या दोन्ही फलंदाजांना मैदान सोडून परत बोलावण्याचा निर्णय घेतला आणि तसे निर्देशही दिले. पण, नंतर त्याने आपला विचार बदलला आणि तीन-एक मिनिटांच्या ब्रेकनंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. अर्थात, या ब्रेकमुळे रोव्हमनची लय बिघडली आणि दिल्लीची संधी हुकल्याचे लवकरच स्पष्ट झाले.
जर मैदानी पंचांनी तो नोबॉल दिला असता तर!
शेवटच्या 4 चेंडूत 4 षटकारांची गरज असताना मकॉयने तिसरा चेंडू षटकारासाठी पिटाळला, तो पंचांनी नोबॉल दिला नाही. पण, हा नोबॉल दिला गेला असता तर दिल्लीच्या फलंदाजांना एक फ्री हिट मिळाली असती आणि 4 चेंडूत 18 धावा, असे समीकरण झाले असते. पण, नोबॉल दिला गेला नाही आणि 3 चेंडूत 18 धावांची गरज असे समीकरण होते आणि ते दिल्लीला पेलवले नाही.
पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार, राजस्थानचे धाबे दणाणले, पण…
शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने पहिल्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार खेचले. त्याने पहिला चेंडू लाँगऑफकडे, दुसरा चेंडू कव्हर्सकडे तर तिसरा चेंडू मिडविकेटकडे षटकारासाठी पिटाळत एकच खळबळ उडवून दिली. त्याच्या या धडाकेबाज फटकेबाजीमुळे मकॉयसह अवघ्या राजस्थानच्या पथकाचे धाबे दणाणले. पण, दिल्या न गेलेल्या नोबॉल नाटय़ामुळे दिल्लीची पकड हलकी झाली आणि यामुळे अंतिमतः राजस्थानला 15 धावांनी सहज विजय संपादन करता आला.