राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्सवर 6 गडी राखून विजय
मुंबई / वृत्तसंस्था
आश्वासक युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कारकिर्दीतील सर्वोत्तम 68 धावांची खेळी साकारत स्वप्नवत पुनरागमन केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सला 6 गडी राखून नमवले आणि प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा हा पहिलाच विजय ठरला. पंजाबने 20 षटकात 5 बाद 189 धावांचा डोंगर रचल्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकात 4 बाद 190 धावांसह सहज विजय संपादन केला.
करुण नायरऐवजी संघात वर्णी लागलेल्या 20 वर्षीय जैस्वालने परिपूर्ण खेळ साकारत 41 चेंडूत 68 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 9 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत राजस्थानने 2 चेंडूंचा खेळ बाकी राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह राजस्थान रॉयल्स 11 सामन्यात 14 गुणांसह तिसऱया स्थानी विराजमान असून आणखी एक विजय संपादन केल्यानंतर त्यांचे पहिल्या चारमधील स्थान जवळपास निश्चित होऊ शकेल. येथील पराभवामुळे पंजाबचा संघ मात्र आणखी अडचणीत आला आहे. सध्या त्यांच्या खात्यावर 11 सामन्यात 10 गुण आहेत. राजस्थानने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंमध्ये जैस्वालचा समावेश असला तरी या हंगामात त्याचा हा केवळ तिसरा सामना होता. ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर (16 चेंडूत 30) फ्लाईंग स्टार्टनंतर पॉवर प्लेच्या आतच बाद झाल्यानंतर जैस्वाल क्रीझवर आला.
कर्णधार संजू सॅमसन (23) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जैस्वालने फटकेबाजी सुरु केली आणि यामुळे राजस्थानला दिलासा लाभला. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा सहज समाचार घेत अवघ्या 33 चेंडूतच आपले अर्धशतक साजरे केले. रिव्हर्स स्वीप, लॅप स्कूप, क्लासिकल ड्राईव्हसारख्या फटक्यांची रतीब लावत त्याने पंजाबच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. जैस्वाल व देवदत्त पडिक्कल यांनी यादरम्यान 37 चेंडूत 56 धावांची भागीदारी साकारली. जैस्वाल नंतर अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने पंजाबला दिलासा लाभला. पण, त्यावेळी राजस्थानला 35 चेंडूत केवळ 49 धावांची आवश्यकता होती.
अंतिम टप्प्यात शेवटच्या षटकात 8 धावांची आवश्यकता असताना राजस्थानने सहज आगेकूच केली. हेतमेयरच्या उत्तुंग षटकारासह त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी, पंजाब किंग्सने 5 बाद 189 धावा केल्या, त्यावेळी लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने 4 षटकात 28 धावात 3 बळी घेतले. या 4 षटकात चहलने 10 चेंडू निर्धाव टाकले. मागील 4 सामन्यात केवळ 2 बळी घेणाऱया या दिग्गज फिरकीपटूची गोलंदाजी येथे उत्तम बहरली. त्याने मयांक अगरवाल (15), जॉनी बेअरस्टो (40 चेंडूत 56) यांना केवळ तीन चेंडूंच्या अंतरात बाद केले. जितेश शर्माने 18 चेंडूत नाबाद 38 धावा फटकावल्यानंतर पंजाबला 190 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स ः 20 षटकात 5 बाद 189 (जॉनी बेअरस्टो 40 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 56, जितेश शर्मा 18 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 38, लियाम लिव्हिंगस्टोन 14 चेंडूत 22, मयांक 15, शिखर धवन 12. अवांतर 14. यजुवेंद्र चहल 4 षटकात 3-28, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 1 बळी).
राजस्थान रॉयल्स ः 19.4 षटकात 4 बाद 190 (यशस्वी जैस्वाल 41 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 68, जोस बटलर 16 चेंडूत 30, संजू सॅमसन 12 चेंडूत 23, देवदत्त पडिक्कल 32 चेंडूत 31, शिमरॉन हेतमेयर 16 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 31. अवांतर 7. अर्शदीप सिंग 4 षटकात 2-29, कॅगिसो रबाडा, ऋषी धवन प्रत्येकी 1 बळी)