वृत्तसंस्था /मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे राजस्थान रॉयल्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. राजस्थान रॉयल्स संघाने यापूर्वी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या संघातील सलामीचा फलंदाज जोस बटलर आक्रमक खेळी करून राजस्थान संघाला आणखी एक विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारचा सामना जिंकल्यास या संघाचे 18 गुण होतील आणि ते गुणतक्त्यात पहिल्या दोन स्थानामध्ये प्रवेश करू शकतील. राजस्थान संघाचा नेट रन रेट (+0.304) सरस असून लखनौ संघाचा नेट रनरेट +0.251 आहे. यामुळे राजस्थान संघ प्राथमिक फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. राजस्थान संघातील सलामीचा फलंदाज बटलरने या स्पर्धेत सातत्य राखले असून त्याने 627 धावा जमवित आघाडीचे स्थान मिळविले आहे पण गेल्या चार सामन्यामध्ये बटलर फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले आहे. बटलरने गेल्या चार सामन्यात 22, 30, 7, 2 धावा जमविल्या आहेत. त्याने या स्पर्धेत तीन शतके आणि तीन अर्धशतके नोंदविली आहेत. राजस्थान संघातील गोलंदाज यजुवेंद्र चहलने आतापर्यंत 24 गडी बाद केले आहेत. राजस्थान संघाची फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने बटलर, जस्वाल, कर्णधार सॅमसन, हेतमेयर यांच्यावर असून गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने बोल्ट, रवीचंद्रन अश्विन, चहल, कुलदीप यादव प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर राहील.
चेन्नई संघाची या स्पर्धेतील कामगिरी दर्जाहीन झाली असून त्यांच्या अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. धोनीने 206, रायडूने 271 धावा जमविल्या तर गोलंदाजीत मुकेशने 16, महेश तिक्षणाने 12 गडी बाद केले आहेत. राजस्थानच्या चहलने 24, अश्विनने 10, प्रसिद्ध कृष्णाने 15, बोल्टने 12 गडी बाद केले आहेत.