झगडत असलेल्या पंजाबविरुद्ध आयपीएल साखळी सामना आज
मुंबई / वृत्तसंस्था
फलंदाजीतील उणिवा दूर करत आपली मोहीम विजयपथावर परत आणण्यासाठी राजस्थान रॉयल्स आज पंजाब किंग्सविरुद्ध लढतीत महत्त्वाकांक्षी असेल. राजस्थान रॉयल्सचा संघ एकवेळ या हंगामात गुजरात टायटन्सशी तगडी स्पर्धा देण्याच्या पवित्र्यात होता. पण, नंतर अचानक त्यांचा सूर हरवला आणि लागोपाठ पराभव पत्करावे लागल्याने ते काहीसे खाली घसरत गेले. आज दुपारी 3.30 वाजता खेळवल्या जाणाऱया लढतीत पंजाबच्या खराब फॉर्मचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्सचा संघ मागील लढतीत टेबलटॉपर्स गुजरात टायटन्सला चक्क 8 गडी राखून नमवल्याने ताज्या दमाने, आणखी निर्धाराने मैदानात उतरेल. मयांक अगरवालच्या नेतृत्वाखालील हा संघ विजयी धडाका कायम राखण्यासाठी विशेष प्रयत्नशील असेल.
शुक्रवारच्या लढतीपूर्वी राजस्थानचा संघ तिसऱया स्थानी विराजमान होता. जोस बटलरचा धडाकेबाज फॉर्म ही या संघाची जमेची बाजू ठरत आली आहे. इंग्लिशमन जोस बटलर 588 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बराच आघाडीवर असून केवळ मुंबई व केकेआर या दोनच संघाविरुद्ध तो मोठी खेळी साकारु शकला नाही आणि योगायोगाने या दोन्ही सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावे लागले.
आघाडी लाईनअपमधील संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल काही टप्प्यात उत्तम खेळले असले तरी त्यांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. या उभयतांसह शिमरॉन हेतमेयरला सूर सापडला तर हे त्रिकुट कोणत्याही गोलंदाजी लाईनअपचा समाचार घेण्यासाठी सक्षम असेल. राजस्थानची गोलंदाजी बऱयापैकी आहे. मात्र, त्यांना मागील 2 सामन्यात अनुक्रमे 158 व 152 धावांचे संरक्षण करता आले नव्हते. यजुवेंद्र चहल गोलंदाजांमध्ये 19 बळींसह आघाडीवर असून ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन व प्रसिद्ध कृष्णा यांनीही उत्तम कामगिरी साकारली आहे.
संभाव्य संघ
पंजाब किंग्स ः शिखर धवन, मयांक अगरवाल, अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, ऋतिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन इलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेन्नी हॉवेल.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव ज्युनियर, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.
पंजाबला फलंदाजीत सातत्य राखणे आवश्यक
शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन व भानुका राजपक्षसारखे अव्वल दर्जाचे खेळाडू संघात असतानाही पंजाबला या हंगामात फलंदाजीत चिंता जाणवत राहिली आहे. जॉनी बेअरस्टो अद्याप अपेक्षापूर्ती करु शकलेला नाही. शिवाय, मयांक अगरवालला देखील सूर सापडलेला नाही. या संघाने गोलंदाजीत मात्र गुजरातला 150 धावात रोखण्याचा पराक्रम गाजवला होता. दक्षिण आफ्रिकन स्पीडस्टार कॅगिसो रबाडाने मागील लढतीत 4 बळी घेतले. याशिवाय, अर्शदीपला फारसे बळी मिळवता आले नसले तरी तो फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी ठरत आला आहे.