वृत्तसंस्था/ फोर्ट वर्थ
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा प्रियांशु राजवतने पुरूष एकेरीची तर महिला एकेरीत मालविका बनसूदने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरूष एकेरीच्या सामन्यात राजवतने चीन तैपेईच्या केईचा 21-18, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. आठव्या मानांकित राजवतने गेल्या वर्षी ओर्लेन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. महिला एकेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित मालविका बनसूदने झेक प्रजासत्ताकच्या स्वेबीकोव्हाचा 15-21, 21-19, 21-14 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मालविकाचा पुढील फेरीतील सामना स्कॉटलंडच्या गिलमुरशी होणार आहे. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी उपांत्यपूर्व फेरी काढताना चीन तैपेईच्या शेन आणि झु यांचा 16-21, 21-11, 21-19 असा पराभव केला.