कोल्हापूर प्रतिनिधी
नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेश विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे. या संस्थेच्या नियामक मंडळात उपाध्याक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राजाची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात मोठी असून, देशाच्या सकल उत्पन्नामध्ये राज्याचा वाटा 15 टकके आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत कार्यरत असलेल्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली. मित्र संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वी केली आहे.
गुरुवारी शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ‘मित्र’ संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात उपाध्यक्ष पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर राजेश क्षीरसागर यांनी राज्याचा विकास साधण्यासाठी या संस्थेची स्थापना करताना त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी असून, या संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.


previous post