ग्रोहे-हुरुन इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट 2021 जाहीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रियल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफ कंपनीचे चेअरमन राजीव सिंह हे 61 हजार 220 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वाधिक श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. एका अहवालानुसार राजीव सिंह यांच्या संपत्तीत जवळपास 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे एम. पी. लोढा कुटुंबाची संपत्ती 52 हजार 970 कोटी रुपयांवर राहिली असून ते दुसऱया स्थानी आहेत.
चंदू रहेजा आणि के रहेजा यादीत तिसऱया स्थानी राहिले आहेत. ग्रोहे-हुरुन इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट 2021 ची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात भारतातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. ऍम्बसी ग्रुपचे जितेंद्र विरवानी 23 हजार 620 कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथ्या स्थानी असून यानंतर 22 हजार 780 कोटी रुपयांच्या संपत्तीसह ओबेरॉय रियल्टीचे विकास ओबेरॉय, हिरानंदन कम्युनिटीचे निरंजन हिरानंदानी (22 हजार 250 कोटी), एमथ्रीएम इंडियाचे बसंत बन्सल (17 हजार 250 कोटी) यांचा नंबर लागतो.