Satara Half Hill Marathon 2022 : गिजीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरचा 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव आहे.
यंदा प्रचंड मोठ्या संख्येत सातारा मॅरेथॉन पार पडली. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तैनात होत्या. मॅरेथॉन सुरू होऊन एक तासही पार पडला नव्हता. तोच राजक्रांतीलाल अर्धे अंतर करून पार झालाही नव्हता तोच धावमार्गावर तो पडला. तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या यशवंत हॉस्पिटलला हलवले. मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे काहींनी सांगितले. त्यांनंतर मृतदेह जिल्हा सरकारी दवाखान्यात हलवले. शवविच्छेदन करण्यात आले पण मृत्यूचे नक्की कारण समजू शकले नाही.


मॅरेथॉन ऐन रंगात आली असतानाच ही दुर्घटना घडली. संयोजकांमध्ये बहुतेक डॉक्टर्स असल्याने सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. तातडीने राजक्रांतीलाल यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून ते सातारा जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या “आपलं पुणे” या मॅरेथॉनमध्येही अशी दुर्घटना घडली होती. तेंव्हा तर जखमी व्यक्तीला अँब्युलन्सपर्यँत उचलून न्यावे लागले असल्याचा अनुभव मॅरेथॉन पटू उदय पराडकर यांनी “तरुण भारत”ला सांगितला. सातारा हिल मॅरेथॉनमध्ये ही दुर्घटना घडल्याने प्राईज डिस्ट्रीबुशननंतर आयोजकांवर शोककळा पसरली. मात्र देशभरातून आलेल्या धावपटूंनी देशांतील सर्वात सुंदर आयोजन आणि अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या सातारा हिल मॅरेथॉनला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली.
याच मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकवलेल्या कोल्हापूरच्या परशुराम भोई यांनी आयोजन उत्तम होते पण ही दुर्घटना व्हायला नको होती असे म्हणत हळहळ व्यक्त केली.या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत असतानाच साताऱ्यातील काहींनी कांगावा करत इप्सित साध्य करण्याचा काही काळ प्रयत्न केला होता, हे दुर्दैव असल्याचे स्पष्ट बोलून दाखवत अनेक मॅरेथॉन पटूनी साताऱ्याचा निरोप घेतला.