हृदयविकाराच्या धक्क्यानंतर प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्ली एम्समधील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर बुधवारी संध्याकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली. परंतु त्यांचा मेंदू सध्या कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या दमदार कॉमेडीसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. वर्षानुवर्षे राजू आपल्या कॉमेडीने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. राजू यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचे होते. स्टेज परफॉर्मर म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात करत कॉमेडियन होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
राजू यांचा धाकटा भाऊ काजू श्रीवास्तव यांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कानाखालील गुठळय़ावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून ते एम्समध्ये दाखल आहेत, मात्र राजू यांच्या प्रकृतीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राजू यांच्यावर एम्समधील दुसऱया मजल्यावर असलेल्या कार्डियाक युनिटच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कुटुंबातील दोघे एकाचवेळी रुग्णालयात दाखल झाल्याने संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे.