ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असतानाच राज्यसभेच्या रिंगणात आणखी एक उमेदवार उतरला आहे. त्याने मत देणाऱ्या आमदारांना चक्क टाटा सफारी गाडीची ऑफर दिली आहे. उस्मानाबादेतील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी ही ऑफर दिली असून, आज (31 मे) मुंबई येथे ते राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आणि संसदेत पाठवावं. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. मतदान करणाऱ्या आमदारांना मी प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट देईन. ही गाडी मतांची लालच म्हणून नाही तर आमदारांना मतदारसंघात फिरता यावं म्हणून भेट असेल, असे निटूरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी 42 मतांची गरज आहे. या 42 आमदारांना सफारी गाडी देण्यासाठी किती खर्च येईल, याचाही हिशोब निटुरे यांनी केला आहे.
निटूरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन घेतले असून प्रती गाडी 26 लाखप्रमाणे 11 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. निटुरे यांची ऑफर आमदार स्वीकारतील का? असा प्रश्न जरी असला तरी त्यांच्या या ऑफरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, निटूरे यांनी यापूर्वी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविली होती.