मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) हे दोन पैलवान मैदानात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी अखेर मैदान मारले. सकाळपासूनच आनंद उत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांनी पहाटे गुलाल, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. मुंबईप्रमाणेच कोल्हापुरातही (Kolhapur) तेच आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संजय की धनंजय अशा लढतीत कोल्हापूरला भाजपचा पहिला खासदार मिळाला. तब्बल चार वर्षांनंतर महाडिक हे खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून आले आहेत. (Rajyasabha Election 2022 Result) संजय पवार यांना ३३ तर महाडिक यांना ४१ मते मिळाली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवारी दिल्याने माविआची कोंडी केली होती. या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांनी वारंवार केला होता. त्यामुळे ही निवडणूक काटे की टक्कर पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि चंद्रकांतदादा (Chandrakant Patil)यांनी प्रचंड जुळवाजुळव केली. अखेर यांच्या प्रयत्नाला आज यश मिळाले. भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अपक्ष आणि इतर छोटे पक्षांच्या मदतीची गरज होती. ऐनवेळी या पक्षाने साथ दिल्याने भाजपाला आपला उमेदवार निवडून आणण्यात यश आले.
राज्यसभेत निवडणुकीत सकाळपासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कार्यालयासमोर मोठा मंडप घालून विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. येऊन येऊन येणार कोण धनंजय महाडिक शिवाय हाय कोण अशा घोषणा देत कार्यकर्ते सकाळपासूनच उत्साहित होते. अंतिम निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली.