Tarun Bharat

रक्षा विसर्जन पुन्हा जुन्या वळणावर…

पंचगंगा स्मशानभूमीत रक्षा पडून: पुन्हा जुन्या परंपराचाच आग्रह

कोल्हापूर /सुधाकर काशीद

कोरोना काळात अंत्यसंस्कारानंतर रक्षा विसर्जन लगेच दुसऱया दिवशी होत होते. रक्षा विसर्जनाच्या वेळी विविध प्रकारचे नैवेद्य ठेवणेही आपोआप बंद झाले होते. कोरोनाच्या त्या आपत्तीच्या काळात पारंपरिक प्रथा परंपरा बाजूला ठेवल्या गेल्या होत्या. आता मात्र कोरोना हटला आहे. सारे काही सुरळीत सुरु झाले आहे. आणि पुन्हा प्रथा परंपरा सोबत घेऊन रक्षाविसर्जनाला सुरुवात झाली आहे. चांगला दिवस बघूनच किंवा ठराविक दिवस वगळूनच रक्षा विसर्जन या पद्धतीमुळे स्मशानभूमीत एकाच मृतदेहाची रक्षा चार चार दिवस पडून राहू लागली आहे.

आहे ती स्मशानभूमी कोल्हापूरची लोकसंख्या व मृत्यूचे प्रमाण यासाठी पुरेशी आहे. पण स्मशानातील रक्षाविसर्जनाच्या विसंगत पद्धतीमुळे स्मशानभूमी अपुरी पडू लागली आहे. मुळात पंचगंगा स्मशानभूमीची अवस्था अतिशय अडचणीची. खरोखर स्मशानकळा कशी असते याची प्रचिती आता तेथे येत आहे. स्मशानभूमीच्या एका भागातले फाटलेले गंजलेले पत्रे बदलण्यास वेळ नाही अशी अवस्था आहे. आणि त्यातच स्मशानभूमीत अंत्यदहनाच्या जागेवर अगोदरच अंत्यदहन झालेली पण पडून असलेली रक्षा यामुळे स्मशानभूमीत नवीन मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जागा सहज उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे. जर प्रत्येक अंत्यविधी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झाले तर आहे ती स्मशानभूमीही सद्यस्थितीत कोल्हापूरकरांना पुरेशी ठरू शकणार आहे.

अंत्यविधी बरोबरच त्यानंतर केले जाणारे रक्षा विसर्जन हा तसा खूप भावनिक विषय आहे. कोल्हापुरात अंत्यविधीला जेवढी उपस्थिती नसते तेवढी उपस्थिती रक्षा विसर्जनाच्या वेळी असते. त्यामुळे रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीत पाय ठेवायलाही जागा नसते. एकाच वेळी रक्षा भरणे सुरुवात झाल्यामुळे साऱया परिसरात उडत असते. त्यानंतर नैवेद्य ठेवण्याचा विधी होतो. कावळय़ाने नैवेद्याला टोच लावल्याशिवाय हा विधी पूर्ण होत नाही. त्या त्या वेळेच्या परिस्थितीत कधी कावळा पहिल्या सेकंदात एखाद्या नैवेद्याला स्पर्श करतो. कधी कधी तासभर प्रतीक्षा केली तरी कावळा नैवेद्याला स्पर्श करत नाही. त्यामुळे केवळ प्रतीक्षेत स्मशानात तास तासभर गर्दी थांबून असते. त्या गर्दीची नजर फक्त स्मशानावरच्या छतावर बसलेल्या कावळय़ांच्या कडे असते.

कोल्हापुरात गुरुवार, शुक्रवार, शनिवार, संकष्टी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा व कोणत्याही सणाचा दिवस या दिवशी रक्षा विसर्जन केले जात नाही. त्यामुळे रक्षा स्मशानभूमीतच पडून राहते. भावनेचा मुद्दा असल्याने स्मशान कर्मचारी परस्पर रक्षा हटवून तेथे दुसऱया अंत्यविधीसाठी जागाही करू शकत नाहीत. त्यामुळे आहे ती स्मशानभूमी अपुरी पडते. कोरोना संसर्गाच्या काळात या साऱया प्रथा परंपरा आपोआपच खंडित झाल्या होत्या. त्यावेळी रक्षा विसर्जन दुसऱया दिवशीच किंवा सकाळी अंत्यविधी झाला असेल तर संध्याकाळी रक्षा विसर्जन होत होते. फक्त एका तांब्यात काही रक्षाबंधन ठेवली जात असे. त्यावेळी नातेवाईक ही प्रथा परंपरेचा कोणताही आग्रह न ठेवता प्रतिकात्मक रक्षा विसर्जन करत होते. नैवेद्य म्हणून असंख्य पदार्थ न ठेवता फक्त एखादे फळ केव्हा वाटीभर दहिभात ठेवत होते. कोरोना काळात मृत्यूचे म्हणजेच अंत्यविधीचे प्रमाण जास्त असूनही त्यामुळे अंत्यविधी सुलभ होत होते.

आता मात्र पुन्हा सारे वेळापत्रक बिघडले आहे. रक्षा विसर्जन चांगला दिवस बघूनच सुरू झाले आहे. स्मशानातील कर्मचाऱयांची त्यामुळे खूप अडचण झाली आहे. रक्षाविसर्जन लगेच दुसऱया दिवशी करा अशी नातेवाईकांना विनंती करणे म्हणजे धाडस ठरत आहे. त्यामुळे या क्षणी स्मशानभूमी राखेचे ढीगच्या ढीग चितेच्या ठिकाणी पडून आहेत.

विद्युत दाहिनी हाच पर्याय

गॅस दाहिनी आणि विद्युत दाहिनी सुरू झाली की रक्षा लगेच बाजूला काढावीच लागणार आहे. त्यापैकी गॅस दाहिनी येत्या आठडय़ात सुरू होईल अशी परिस्थिती आहे. चार विद्युत दाहिनीचा प्रस्ताव करण्याचे काम चालू आहे. लाकूड व शेणीचीची उपलब्धता सध्या कमी आहे. त्यामुळे या परिस्थितीत भविष्यात विद्युत दाहिनी हाच पर्याय ठरणार आहे.

35 लाख शेणी

सध्या शहरातील चार स्मशानभूमीसाठी मिळून वर्षाला 35 लाख शेणी लागतात चारशे ते पाचशे टन लाकूड लागते.शेणी तर मिळतच नाहीत. ग्रामीण भागात गावोगावी जाऊन शेणी गोळा कराव्या लागतात. आता तर शेणी पुरवण्यासाठी तिसऱयांदा निविदा काढावी लागली आहे.

Related Stories

जिल्हा बँक : पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड पक्की

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : स्वाभिमानीने फाडले ऊसदराचे करार

Archana Banage

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Archana Banage

पंढरपुरातील भोंदूबाबाने महिलेला लुटले; 2.7 लाखांच्या मुद्देमालासह अटक

Archana Banage

हातकणंगले येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

Archana Banage

धनगर आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा : प्रवीण काकडे

Archana Banage