Tarun Bharat

पुलाच्या पश्चिमेला रक्षाविसर्जन करू नये

खानापूरवासियांची जनतेला विनंती : जुन्या पुलाच्या खालील नदीपात्रात राख सोडल्यास ‘मलप्रभे’ चे पाणी स्वच्छ राहण्याची शक्यता

वार्ताहर /खानापूर

खानापूरच्या जनतेला सदोदीत पाणीपुरवठा करणाऱ्या मलप्रभा नदी पात्राच्या खानापूर येथील घाटाजवळ पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. सदर पाण्यामुळे खानापूर शहराला पिण्याचे पाणी व अन्य उपयोगासाठी पाणी सुलभ झाले आहे. त्यातच खानापूर शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. असे असताना अनेकजण रक्षाविसर्जनासाठी नदी घाटावर येवून त्यात राख सोडत आहेत. त्यामुळे नदी पात्र दूषित होत आहे. राख सोडणाऱ्यांनी मलप्रभा नदीच्या जुन्या पुलाच्या खालील नदी पात्रात राख सोडल्यास मलप्रभा नदी घाटाचे पाणी स्वच्छ राहील. याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मलप्रभा नदी घाटाजवळील जुन्या पुलाला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाणी अडवले जाते. हे पाणी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहराला पाणी पुरवण्यासाठी सोयीचे होते. नदी पात्राच्या नव्या पुलाजवळील जॅकवेलद्वारे पाणी खेचून ते गणेश मंदिराजवळील पाणी शुद्धीकरण केंद्रात नेले जाते. व तेथून नळपाणी योजनेद्वारे खानापूर शहर वासियांना दिले जाते. खानापूर शहराजवळून मलप्रभा नदीपात्र वाहत असल्याने मे महिना वगळता वर्षभर नदीच्या पाण्याचा वापर होतो. त्यामुळे खानापूर शहराला म्हणावी तशी पाण्याची समस्या भेडसावत नाही.

हुबळी, धारवाड शहराला ‘मलप्रभेचा’ पाणीपुरवठा

तालुक्याच्या पश्चिम भागात जांबोटी, कणकुंबी, मोदेकोप परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस पडत असल्याने नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. ते पुढे सौंदत्तीजवळील नवलतीर्थ धरणात साठवून हुबळी, धारवाड शहराला त्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यात पाण्याची समस्या भेडसावत नसल्याने व नदी पात्रात मुबलक पाणी राहिल्याने त्यावेळी पाणी अडवले जात नाही. परंतु नोव्हेंबर महिन्यात गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पुलाला फळ्या घालून पाणी अडवण्यात येते. मध्यंतरी लाकडी फळ्या घातल्याने पाणी झिरपण्याचा प्रकार घडत होता. अलीकडच्या काहीवर्षात लोखंडी फळ्या घालून पाणी अडवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पाणी अडवल्यानंतर आठवड्याभरात मलप्रभा नदी घाटाजवळील पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. सदरचे पाणी उन्हाळ्यात वापरास येते.

जुन्या पुलाच्या खालच्या बाजूला राख टाका

खानापूर शहरामधील अनेक लोक पहाटे अंघोळीसाठी नदी पात्रात घाटाजवळ जातात. ही नित्याची सवय राहिल्याने मलप्रभा नदी स्वच्छ व सुंदर ठेवणे यासाठी खानापूर शहरवासियांकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्याला नगरपंचायतीची साथही तितकीच लाभते. परंतु बेळगाव व खानापूर तालुक्यातील काहीजण रक्षाविसर्जनासाठी खानापूर येथील नदी घाटावर येतात. व घाटावरच रक्षाविसर्जन करत आहेत. तसे पाहता जुन्या पुलाच्या खालच्या बाजूला रक्षाविसर्जन करण्यासाठी सोयीचे आहे. त्यामुळे पाणी अस्वच्छ होण्याचा प्रकार घडत नाही. जे लोक मलप्रभा नदी घाटावर राख टाकत आहेत. त्यांनी जुन्या पुलाच्या खालच्या बाजूला राख टाकावी, असे खानापूर वासियांचे म्हणणे आहे.

Related Stories

अखेर ‘त्या’ मुलांना मिळाला शाळा सोडल्याचा दाखला

Amit Kulkarni

अतिक्रमण हटाव मोहीम ठरली फार्स

Omkar B

कलमेश्वरनगर हिंडलगा येथे हळदीकुंकू समारंभ

Omkar B

शेतकऱयांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे

Patil_p

आंबेवाडीला जोडणाऱया संपर्क रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

योग दिन आज ऑनलाईनद्वारे साजरा करणार

Patil_p