पालिकेचा कार्यकाळ मे मध्ये संपुष्टात
फोंडा : फोंडा नगरपालिकेचा कार्यकाळ येत्या 20 मे रोजी संपुष्टात येत असल्याने एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच प्रभागांची चाचपणी तर राजकीय पॅनलनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकूण 15 प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार असून अतिरिक्त मतदारसंख्या असलेल्या काही प्रभागांची फेररचना होणार आहे. मतदार यादी येत्या चार दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. सध्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष प्रभाग आरक्षणाकडे लागून राहिले आहे. सत्ताधारी भाजपासाठी फोंडा पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. विद्यमान 15 नगरसेवकांपैकी एक दोन वगळल्यास बहुतेक नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसतात. याशिवाय काही आजी माजी नगरसेवकही पुन्हा पालिकेच्या राजकारणात प्रवेश कऊ पाहत आहेत. त्यादृष्टीने मतदारांच्या अनौपचारीक गाठीभेटीही त्यांनी सुरु केल्या आहेत. बरेच नवीन चेहरेही इच्छुक आहेत व त्यांचा कल सत्ताधारी पक्ष किंवा एखाद्या पॅनलकडे दिसतो. मागील निवडणुकीत 15 जागांपैकी डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली रायझिंग फोंडाच्या पॅनलने सर्वाधिक सात, भाजपाने पाच तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलल्याने मगो व भाजपा युती करणार की स्वतंत्रपणे लढणार याबाबत अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. डॉ. केतन भाटीकर यांना फोंडा मतदारसंघात आपला प्रभाव व वर्चस्व राखण्यासाठी युतीपेक्षा स्वतंत्र पॅनलला अधिक पसंती देतील, असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जातो. डॉ. भाटीकरही ही शक्यता नाकारीत नाहीत. मागच्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेस पक्षात असलेले फोंड्याचे आमदार रवी नाईक हे सध्या भाजपाचे आमदार व मंत्री असल्याने त्यांच्यासाठी फोंडा पालिका जिंकणे प्रतिष्ठेचे असेल. शिवाय त्यांचे सुपूत्र रितेश नाईक हे नगराध्यक्ष असल्याने त्यांना आपल्या राजकीय भवितव्यासाठी पालिका निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
रॉय नाईक मोठ्या गेमप्लॅनच्या तयारीत
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे ती मंत्री रवी नाईक यांचे दुसरे चिरंजीव रॉय नाईक यांची. तीन वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या रॉय नाईक यांनी वेगळीच रणनीती आखत मतदारांच्या गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. फोंड्यातील बहुतेक प्रभागामध्ये त्यांचा चाहतावर्ग असल्याने ते नेमक्या कुठल्या प्रभागातून रिंगणात उतरतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. पंडितवाडा प्रभाग 11, शांतीनगर प्रभाग 1 यास अन्य एक दोन प्रभागातील त्यांच्या समर्थकांकडून आग्रह वाढत आहे. एका प्रभागात तर विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्षांने रॉयसाठी आपला स्वत:चा प्रभाग सोडण्याची तयारीही दर्शविली आहे. रॉय हे एका मोठ्या गॅमप्लॅनच्या तयारीनेच पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरल्याची चर्चा सध्या फोंड्यात सुरु आहे.
बहुतेक नगरसेवक आणखी एका इनिंगच्या तयारीत
काँग्रेस पक्षातर्फेही काही प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पक्ष पातळीवर सध्यातरी कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. काही उमेदवारांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शुभेच्छांचे जाहीर फलक लावून आपल्या उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत. इतर काही इच्छुक उमेदवार एखादा पॅनल किंवा पक्षाकडून ऑफर मिळणार यासाठी गळ टाकून आहे. 15 प्रभागांपैकी एक दोन महिलांसाठी व इतर मागासवर्गींयासाठी आरक्षित झाल्यास विद्यमान नगरसेवकांनाही आपले हक्काचे प्रभाग सोडून शेजारील प्रभागातून नशिब आजमावे लागणार आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षण हाही कळीचा मुद्दा ठरतो. विद्यमान नगरसेवकांपैकी भाजपा मंडळाचे अध्यक्ष असलेले माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, गीताली तळावलीकर हे हॅट्ट्रीकच्या तर व्यंकटेश उर्फ दादा नाईक हे चौथ्यांदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. रितेश नाईक, आनंद नाईक, प्रदीप नाईक, अमिना नाईक, विरेंद्र ढवळीकर, चंद्रकला नाईक, विलीयम आगियार हे दुसऱ्या इनिंगची तयारी करीत आहेत.
आणखी एक तिसरी आघाडी
फोंडा पालिकेच्या निवडणुकीत आणखी एक तिसरी आघाडी म्हणजेच भाजपमधील काही जुने लोक व समविचारी नागरिक मिळून स्वतंत्र पॅनल उतरविण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही जोरात सुऊ आहे. यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी यशस्वी डावपेच खेळत भाजपाला धक्का दिलेला आहे. पालिका निवडणूक जरी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही, तरी पडद्यामागील राजकीय रणनीती जोरात सुऊ आहे.