जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील उद्योग गुजरात व अन्य राज्यात जात आहेत ही बाब निषेधार्ह आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपयश असून त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी युवक जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसिलदार व शहराध्यक्ष उदय पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालय येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली फिरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार संतोष कणसे यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एयरबस हे मोठे उद्योग मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरत- गुवाहाटी दरम्यान ठरल्या प्रमाणे गुजरातला इमाने इतबारे पाठविले आहत. रविवारी सफन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे. प्रेंच कंपनी सफन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा प्रकल्प नागपुरातल्या मिहानमध्ये सुरु होणार होता. यासाठी कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे स़फन ग्रुपचे सीईओ संबंधित अधिकायांना भेटले, परंतू जागा न मिळाल्याने हा प्रकल्प हैदराबादला जात आहे. सैफन ग्रुपचे सीईओ केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले आणि जागे अभावी हा प्रकल्प हैदराबादला जात असल्याच सांगितले. गुजरातला होऊ घातलेली आणि कर्नाटक मध्ये लवकरच होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाला मदत व्हावी, या हेतूने तसेच आपल्या गटाला मिळालेल्या ’खोक्यांच्या ओझ्याखाली आपण महाराष्ट्रातून सगळे उद्योग हद्दपार करत आहात, अशी गंभीर चर्चा महाराष्ट्रात चालू आहे.
आंदोलनात संदीप पाटील, कोमल सरदेसाई, अंजली जाधव, आदित्य कांबळे, प्रियदर्शनी जाधव, सत्यजित जाधव, योगेश कांबळे, कपिल पाटील, संदीप पाटील, आत्माराम पाटील आदी सहभागी झाले होते.