वृत्तसंस्था/ रोहतक
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद राम रहिमला आता 30 दिवसांची संचित रजा मिळाली आहे. राम रहिम हे उत्तरप्रदेशच्या बागपत येथील स्वतःच्या आश्रमात पोहोचले असून त्यांनी संगतसाठी एक रिकॉर्डेड व्हिडिओ जारी केला आहे.
हनीप्रीत तसेच राम रहिमचा चुलत भाऊ या व्हिडिओत दिसून येतो. तर डेरा प्रमुखाचे कुटुंबीय सिरसा येथेच आहे. राम रहिमला नियमांनुसार पॅरोल मिळाला आहे तसेच तुरुंग प्रशासनाकडून कुठलीच अट ठेवण्यात आली नसल्याची माहिती हरियाणाचे मंत्री रणजीत सिंह यांनी दिली आहे. राम रहिमला यापूर्वी 21 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. त्यावेळी तो गुरुग्राम येथील आश्रमात राहिला होता.
हरियाणा सरकारच्या जेल अमेंडमेंट ऍक्टनुसार 2022 मध्ये पॅरोल नियमांमध्ये बदल करण्यात आले असून यानुसार पॅरोलसाठी आता कुठलेही कारण देणे अनिवार्य नाही. पॅरोलमध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करण्यावरही बंदी नाही. तुरुंगातून बाहेर पडल्यावर डेराप्रमुख गुरमीतने सोशल मीडिया लाइव्हद्वारे स्वतःच्या अनुयायांना संबोधित केले आहे.
राम रहिमला 25 ऑगस्ट 2017मध्ये साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत डेराप्रमुख तुरुंगात कैद आहे. पत्रकार छत्रपती हत्या तसेच रणजीत हत्येप्रकरणी देखील त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.