ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर चार-लेनच्या निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला होता. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबले गेलेल्या 9 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप एक जण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेल्या 9 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगाल, 2 नेपाळ, 2 स्थानिक तर एक आसामचा आहे. रामबनच्या एएसपी मोहिता शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रामबनच्या मेकरकोट भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खूनी नाल्यावर चार लेनच्या बोगद्याचे काम सुरू आहे. गुरुवारी रात्री 10.30 वाजता तपासणीवेळी या बोगद्याचा छोटासा भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली होती. एकूण 12 जण या बोगद्यात अडकले होते. त्यामधील दोन जणांना वाचवण्यात यश आले होते तर 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप एक जण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
घटनेवेळी बोगद्यात बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. ही वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले होते.