Tarun Bharat

पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांसी ‘जय महाराष्ट्र’, रामदास कदमांनीही साथ सोडली

मुंबई : शिवसेनेचे निष्ठावंत व पहिल्या फळीतील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यात आज मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रामदास कदम यांनी देखील नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं, अशी खंत व्यक्त करत त्यांनी जय महाराष्ट्र केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून ज्यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून कोकणात शिवसेना पक्ष वाढवला, नारायण राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यावर त्यांच्याविरोधात कोकण पिंजून काढलं, महाराष्ट्रातलही शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रसंगी भाजपवरही तुटून पडले, त्याच रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे.


मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम कधीच केलं नाही. उलटपक्षी माझा आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं, अशी खंत त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

काय लिहले आहे पत्रात?

सन्माननीय उध्दवजी ठाकरे,
यांसी
जय महाराष्ट्र !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे.

Related Stories

करजुवे – मांजरेत वाळूमाफियाना दणका

Patil_p

राज्यातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडणार

Archana Banage

‘त्यांची लाकडं स्मशानात रचली आहेत’; संजय राऊतांची भाजपवर टीका

Archana Banage

मणीपूरम गोल्डच्या राज्यातील सर्व शाखा बंद

Omkar B

विठोबाराय एसटीने निघाले आळंदीला…

Archana Banage

विवाहित हिंदू महिलेच्या संपत्तीवर माहेरच्या नातेवाईकांचाही अधिकार

Amit Kulkarni