Tarun Bharat

अत्यावश्यक औषधांच्या सूचीतून ‘रॅनीटायडीन’ बाहेर

आणखी 25 औषधांचीही ‘हकालपट्टी’ ः कर्करोगाच्या शक्यतेपोटी कारवाई

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आम्लपित्ताच्या विकारावर प्रभावी उपाय मानले गेलेले रॅनीटायडीन हे औषध अत्यावश्यक औषधांच्या सूचीतून बाहेर काढण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासह आणखी 25 औषधेही बाहेर काढण्यात आली आहेत. ही औषधे कर्करोगाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरतात, अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रॅनीटायडीन हे औषध भारतात लोकप्रिय आहे. ते ऍसिलॉक, झिनेटॅक, रॅनटॅक आदी ब्रँड नावानी विकले जाते. डॉक्टर्सही ही औषधे आम्लपित्त (ऍसिडीटी) आणि पोटदुखीच्या विकारांवर सातत्याने सुचवित असतात. आता या औषधांचा पायाभूत क्षार रॅनीटायडीन अत्यावश्यक औषधांच्या सूचीतून बाहेर केल्याने ही औषधे मिळणे कठीण होणार असून ती बरीच महागही होतील अशी शक्यता आहे. या क्षारामुळे कर्करोग (कॅन्सर) होण्याची शक्यता वाढते असे प्रयोगाअंती समजून आले आहे. बऱयाच विकसीत देशांमध्ये यावर बंदी आहे.

औषध नियंत्रकांशी चर्चा

हा निर्णय देशाच्या औषध नियंत्रकांशी चर्चा करुन घेण्यात आला आहे. या निर्णयाचे परिणाम काय होतील आणि पर्यायी सुरक्षित औषधे कोणती आहेत, याचाही विचार करण्यात आला आहे. 2019 पासून या क्षारावर संशोधन होत आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध नियंत्रक संस्थेनेही याच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेनेही (एम्स) हे औषध अनावश्यक मानले जावे असे सूचित केले होते.

झेनटॅक अत्यंत लोकप्रिय

आम्लपित्ताच्या विकारावर झेनटॅक हे औषध जगभरात घेतले जाते. ते गेली चार दशके प्रसिद्ध आहे. 1 अब्ज डॉलर्सचा वार्षिक खप साध्य केलेले ते जगातील प्रथम औषध मानले जाते. हा विक्रम या औषधाने 1988 मध्येच केला होता. आता हे औषध जवळपास बंद होण्याच्या मार्गावर येणार आहे.

महत्वाचा बॉक्स

अनेक औषधे होणार स्वस्त

केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची नवी सूची प्रसिद्ध केल्याने मोठी मागणी असणारी अनेक औषधे स्वस्त होतील, अशी शक्यता आहे. या औषधांमध्ये मधुमेहविरोधी इन्शुलिन ग्लारगाईन, क्षयरोगविरोधी औषध डेलामॅनिड आणि अँटिसेप्टीक आयव्हरमेक्टिन व इतर औषधांचा समावेश आहे.  

ब्लिचिंग पावडरही बाहेर

जंतूनाशक म्हणून प्रसिद्ध असलेली ब्लिचिंग पावडरही आता सूचीतून बाहेर काढण्यात आली आहे. तिची जागा आता निकोटीन रिप्लेसमेंट पद्धतीकडून घेतली जाणार आहे. नव्या सूचीमुळे अनेक विषाणूविरोधी औषधे, लसी, कर्करोगविरोधी औषधे आणि इतर औषधे स्वस्त होतील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात केले आहे.  

कोणती औधधे बाहेर ?

1. अल्टेप्लेस 2. अटेनोलोल 3. ब्लिचिंग पावडर 4. कॅप्रिओमायसिन 5. सेट्रीमाईड 6. क्लोरफिनिरामाईन 7. डायलोक्झेनाईड फॉर्टे 8. डायमरकॅप्रॉल 9. एरिथ्रोमायसीन 10. एथिनाईलस्ट्राडीऑल 11. गॅनसिकलोव्हीर 12. एथिनाईलस्ट्रायडॉल ए, नोरेथीस्टेरोन बी, 13. कानामायसिन 14. लॅमिव्हय़ूडाईन ए,  नेव्हीरापाईन बी, स्टॅव्हूडाईन सी 15. लेफ्ल्यूनोमाईड 16. मिथाईलडोपा 17. निकोटिनामाईड 19. पेंटामाईडीन 20. प्रिलोकाईन ए, लिग्नोकाईस बी 21 प्रोकार्बेझाईन 22. रॅनिटायडीन 23. रिनाब्युटाईन 24. रिफाब्युटाईन 24. स्टाव्हूडाईन ए, लॅमिव्हय़ूडाईन बी 25. सुक्रालफेट 26. व्हाईट पेट्रोलॅटम  

नव्या सूचीतील महत्वाची औषधे

1. निकोटीन रिप्लेसमेंट पद्धती 2. ओरल रिहायड्रेशन सॉल्टस् 3. पॅरासिटेमॉल 4. रिबाव्हिरीन 5. स्ट्रेप्टोमायसिन 6. लोराझेपाम 7. आयव्हरमेक्टीन 8. मेरोपेमेन 9. सेफ्युरॉक्झाईम 10. फिनोक्झिमिथाईल पेनिसिलीन 11. डीलामानाईड 12. लेनालिडोमाईन या औषधांना नव्या सूचीत स्थान मिळाले आहे.

Related Stories

महिंद्रा ग्रुपमध्ये अग्निवीरांना सुसंधी

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 1808 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Tousif Mujawar

देशात 12,408 नवे बाधित, 120 मृत्यू

datta jadhav

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, बचावकार्य सुरु

Archana Banage

देशव्यापी लॉकडाऊन नाही!

Patil_p

पदकांची श्रीमंती, माणसांचे दारिद्रय़!

Patil_p